Breaking
Updated: फेब्रुवारी 16, 2026
कला केंद्रातून परतताना मित्राचा निर्घृण खून; साळेगावचे पाच मित्र पोलिसांच्या अटकेत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात कार्यक्रम पाहून परतत असताना एका ३७ वर्षीय तरुणाचा त्याच्याच पाच मित्रांनी जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील सतीश भागवत मुंडे असे मृताचे नाव असून, याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत पाचही संशयित मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना १२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली असून, जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हा कट रचण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत सतीश मुंडे हा १२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या पाच मित्रांसह चोराखळी येथील कला केंद्रात नृत्य पाहण्यासाठी गेला होता. मध्यरात्री एक वाजेपर्यंत सर्वांनी कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर ते साळेगावकडे परतण्यास निघाले. फिर्यादीनुसार, संशयित आरोपींनी सतीशला आधी मद्यपान करवले आणि त्यानंतर घराकडे परतत असताना जुन्या वादाचा राग मनात धरून त्याला गाठले. चालत्या वाहनात किंवा निर्जन ठिकाणी सतीशला लाथाबुक्क्यांनी पोटावर आणि छातीवर इतकी अमानुष मारहाण करण्यात आली की, गंभीर दुखापतीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी मयताचे वडील भागवत बळीराम मुंडे यांनी १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने हालचाली करत शेख अजमोद्दीन ऊर्फ मुन्ना शेख जिलानी, शेख शकील रौफ, संजय जनार्धन गिते, मधुकर गोरोबा इंगळे आणि दत्ता बाबासाहेब तोंडे या पाच संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ही मारहाण नेमकी कुठे झाली आणि खुनामागचे नेमके कारण काय होते, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
या घटनेमुळे चोराखळी येथील कला केंद्र पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कला केंद्रांमध्ये होणारी गर्दी आणि तेथे सतत उद्भवणारे वाद यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एका तरुणाचा अशा प्रकारे बळी गेल्याने साळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अशा केंद्रांवर पोलिसांचा कठोर वचक असायला हवा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.