Breaking

धक्कादायक: पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मरण्यापूर्वी फेसबुकवर मांडली व्यथा

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

मरण्यापूर्वी फेसबुकवर मांडली व्यथा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: तालुक्यातील नागापूर येथे पत्नी आणि तिच्या नातेवाईकांच्या जाचाला कंटाळून रामेश्वर गव्हाणे या तरुण शेतकऱ्याने आपल्याच शेतात विष प्राशन करून आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रामेश्वरने आपले जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने पत्नीकडून होणारा छळ आणि फसवणुकीचा गंभीर आरोप केला आहे. या फेसबुक पोस्टमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तरुणाने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी अनेकांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

रामेश्वर गव्हाणे हा मुंबई येथे एका वृत्तवाहिनीच्या स्टुडीओमध्ये काम करत होता. मात्र, तीन दिवसापूर्वीच त्याने नोकरी सोडली आणि गावाकडे आला होता. शुक्रवारी (दि.१०) त्याने आपल्या मनातील व्यथा एका पोस्टद्वारे फेसबुकवर मांडल्या. रामेश्वरने आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार गेल्या दोन वर्षांपासून त्याची पत्नी नम्रता जाधव ही त्याचा प्रचंड मानसिक छळ करत होती. पत्नीने खोटा वैद्यकीय अहवाल तयार करून तो गरोदर असल्याचे भासवले. कौटुंबिक वादातून त्याला वारंवार मारहाण होणे तसेच जेवणातून त्रास दिला जाणे अशा गोष्टींना तो सामोरे जात होता. लग्नावेळी नातेवाईकांनी पत्नीच्या आजारपणाची माहिती लपवून आपली फसवणूक केल्याचेही त्याने या पत्रात म्हटले आहे.

पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींनी पैशांच्या आणि संपत्तीच्या हव्यासापोटी हा सर्व कट रचल्याचे रामेश्वरने आपल्या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. केवळ मानसिक त्रास देऊन न थांबता त्याला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी देखील पत्नीकडून दिली जात होती. आपण अत्यंत हतबल झालो असून आता सहन करण्याची शक्ती संपली आहे असे लिहीत त्याने मृत्यूला कवटाळले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. परळी ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून एका उमद्या तरुणाचा असा करुण अंत झाल्याने नागापूर गावावर शोककळा पसरली आहे.


Categories

Recent Posts