Breaking
Updated: सप्टेंबर 6, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : मराठवाड्याचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या श्री योगेश्वरी देवी मंदिराच्या विश्वस्त मंडळावर अखेर नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. नव्याने गठित झालेल्या १९ सदस्यांच्या विश्वस्त मंडळातून झालेल्या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली.
तहसीलदार, अंबाजोगाई हे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. गिरीधारीलाल भराडिया यांची सचिव, अक्षय मुंदडा यांची उपाध्यक्ष, कमलाकर चौसाळकर यांची सहसचिव तर पूजा राम कुलकर्णी यांची कोषाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.
धर्मदाय उपआयुक्त, बीड यांनी २८ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार जुने विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवे विश्वस्त मंडळ जाहीर केले होते. या मंडळाला पुढील पाच वर्षे मंदिर प्रशासनाची सूत्रे देण्यात आली आहेत.
या पदाधिकाऱ्यांसह विश्वस्त मंडळात विनोद दामा, हंसराज देशमुख, शिरीष पांडे, ॲड. शरद लोमटे, श्रीराम देशपांडे, उल्हास पांडे, गौरी जोशी, सारंग पुजारी, राजन पुजारी, नमिता मुंदडा, राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे, संजय भोसले आणि भगवानराव शिंदे या १९ सदस्यांचा समावेश आहे. सध्या मंदिर प्रशासनातील गेल्या दशकभराचा न्यायालयीन वाद संपुष्टात आला असून, नवे विश्वस्त मंडळ पुढील पाच वर्षे मंदिराचे व्यवस्थापन पाहणार आहे. श्रद्धाळूंमध्ये याबाबत समाधान व्यक्त होत आहे.
योगेश्वरी मंदिर हे मराठवाड्यातील श्रद्धास्थान असून दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विशेषतः नवरात्रोत्सव काळात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांना वेग देणे, भाविकांच्या सोयीसुविधा वाढवणे, धार्मिक कार्यक्रमांची नियोजनबद्ध आखणी करणे या जबाबदाऱ्या नव्या समितीसमोर आहेत. नव्या पदाधिकाऱ्यांमुळे मंदिर विकास व व्यवस्थापन अधिक सक्षमपणे होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.