Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई/हैदराबाद : हैदराबाद येथील सनतनगरमध्ये असलेले ईएसआयसी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय हे देशातील प्रथम ‘झीरो रेफरल मॉडेल’ हॉस्पिटल बनले आहे. येथे कोणत्याही रुग्णाला बाहेरच्या रुग्णालयात पाठवले जात नाही. सर्व प्रकारचे जटिल उपचार याच ठिकाणी उपलब्ध आहेत. हे मोठे यश हातोला (ता. अंबाजोगाई) येथील सुपुत्र डॉ. शिरीष चव्हाण यांच्या कुशल नेतृत्वामुळे शक्य झाले आहे. सध्या ते या रुग्णालयाचे डीन म्हणून कार्यरत आहेत.
उपचाराची नवी दिशा
गेल्या ३ वर्षांत येथे २६ किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले असून, १६०० पेक्षा अधिक ओपन हार्ट सर्जरी, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, तसेच डायलिसिस घेणाऱ्या महिलांची सुरक्षित प्रसूतीसुद्धा इथे पार पडली आहे. लाखो रुपयांचे खर्च येणारे हे उपचार येथे पूर्णपणे मोफत केले जातात.
लाखो रुग्णांची निवड: सुविधा आणि तंत्रज्ञान
● रुग्णालयात एकूण ८०० बेड, त्यातील २४४ सुपरस्पेशालिटी बेड
● २०२४ मध्ये ८ लाख ओपीडी रुग्ण, दररोज सरासरी २७३७ रुग्णांची तपासणी
● २०२४ मध्ये ९६,९२६ रुग्ण अॅडमिट, आणि २०,११७ शस्त्रक्रिया
● रुग्णांसाठी ट्रिपल ए प्लस मोबाइल अॅप, ऑनलाइन अपॉइंटमेंट व रिपोर्ट सुविधा
● घरपोच औषध वितरण सुविधा
विशेष निदान सुविधा
डॉ. शिरीष चव्हाण यांनी सांगितले की, रुग्णालयात ६ हजार प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, मुंबईतील टाटा मेमोरियलनंतर भारतात फक्त येथेच ‘HER2-DISH’ मार्कर उपलब्ध आहे, ज्यामुळे स्तन, पोट आणि इतर कर्करोगांचे लवकर निदान शक्य होते.
कोण घेऊ शकतो उपचार?
जे कर्मचारी २१ हजार रुपये पर्यंत पगार घेतात तसेच त्यांचे कुटुंबीय ईएसआय (कर्मचारी राज्य विमा) कार्डच्या आधारे येथे मोफत उपचार घेऊ शकतात. अपंगांसाठी ही मर्यादा २५ हजार रुपये आहे.
डॉ. शिरीष चव्हाण – अभिमान अंबाजोगाईचा!
या ऐतिहासिक यशामागे डॉ. शिरीष गुलाबराव चव्हाण यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्य कारणीभूत आहे. डॉ. शिरीष चव्हाण हे अंबाजोगाई तालुक्यातील हातोला गावाचे सुपुत्र आहेत. त्यांचे शालेय शिक्षण माजलगाव येथे तर महाविद्यालयीन शिक्षण लातूरच्या शाहू कॉलेमध्ये झाले. अंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी भूलशास्त्रातील एमडी पदवी प्राप्त केली आहे. डॉ. चव्हाण यांनी ईएसआयसी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनात नावीन्यपूर्णता, पारदर्शकता आणि सेवा-भावना जोपासली आहे. त्यांच्या कार्यामुळे सरकारी रुग्णालयांची पारंपरिक प्रतिमा बदलत असून, लाखो गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी नवा आशेचा किरण ठरत आहे. अशी कार्यसंस्कृती देशभरात रुजली, तर सरकारी रुग्णालयांची विश्वासार्हता अनेक पटींनी वाढू शकते, हे निश्चित!
Last Updated: June 24, 2025