बीड : शहरातील आसेफ नगर परिसरात दागिने उजळून देतो असा विश्वास बसवून दोन अज्ञात इसमांनी एका डॉक्टर महिलेला फसवले. या घटनेत तब्बल 2 लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी डॉ. कहेकशा जहीरोद्दीन शेख (रा. आसेफ नगर, बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसम त्यांच्या घरी आले. “तुमचे सोने-चांदीचे दागिने उजळून देतो” असा बहाणा करून त्यांनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर संगनमताने घरातील दागिने घेऊन ते पसार झाले. चोरांनी दोन सोन्याच्या बांगड्या, तीन सोन्याच्या अंगठ्या अशा एकूण सव्वा दोन लाखांच्या आईवजावर डल्ला मारला.
या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय नेवरे करीत आहेत.