Breaking
Updated: फेब्रुवारी 16, 2026
प्रख्यात मधुमेहतज्ञ डॉ. अतुल शिंदे यांना राष्ट्रीय स्तरावरील 'डायबिटीज इनिशिएटिव्ह अवॉर्ड' प्रदान
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील प्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ. अतुल शिंदे यांना त्यांच्या गेल्या १३ वर्षांच्या अविरत आणि निस्वार्थ रुग्णसेवेबद्दल ‘डायबिटीज इंडिया’ या नामांकित संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील ‘डायबिटीज अवेरनेस इनिशिएटिव्ह अवॉर्ड – २०२६’ देऊन नुकतेच गौरविण्यात आले. हैदराबाद येथे शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित एका विशेष सोहळ्यात पद्मश्री डॉ. शशांक जोशी आणि आंतरराष्ट्रीय डायबिटीज फेडरेशनच्या अध्यक्षा डॉ. निती पॉल यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. डॉ. शिंदे यांनी मधुमेहाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची आणि सामाजिक जनजागृतीची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
डॉ. अतुल शिंदे यांनी १३ वर्षांपूर्वी अंबाजोगाईतील प्रशांत नगर भागात ‘योगेश्वरी डायबिटीज केअर सेंटर’ची स्थापना केली होती. तेव्हापासून त्यांनी केवळ वैद्यकीय उपचारच दिले नाहीत, तर सातत्यपूर्ण समुपदेशनाद्वारे हजारो रुग्णांना मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यास मदत केली आहे. दरवर्षी जागतिक मधुमेह दिनानिमित्त तालुक्यातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी मोफत रक्त तपासणी, उपचार आणि औषधी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांच्या माध्यमातून केले जाते. ग्रामीण भागातील विविध सण, उत्सव आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिरांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
मराठवाडा विभागातून हा राष्ट्रीय स्तरावरचा मानाचा पुरस्कार मिळवणारे डॉ. अतुल शिंदे हे एकमेव मधुमेह तज्ञ ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे अंबाजोगाई शहरासह संपूर्ण मराठवाड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वैद्यकीय सेवेसोबतच संशोधन, प्रशिक्षण आणि समाजाभिमुख उपक्रमांद्वारे त्यांनी असंख्य रुग्णांचे जीवनमान उंचावण्याचे काम केले आहे. या पुरस्कार सोहळ्याला देशभरातील नामांकित मधुमेह तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. शिंदे यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि रुग्णांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.