Breaking
Updated: July 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupघरात घुसल्याच्या कारणावरून सलग दोन दिवस केली होती बेदम मारहाण
अंबाजोगाई : देवळा (ता. अंबाजोगाई) येथे किरकोळ वादातून गावातील काही तरुणांनी मिळून अविनाश गोरोबा सगट (वय 27) यास दोन दिवस जबरदस्तीने उचलून नेत सतत मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अविनाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी सात जणांविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी केशरबाई गोरोबा सगट (रा. देवळा, ता. अंबाजोगाई) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अविनाश यास दिनांक 15 जुलै 2025 रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गावातील वैभव नामदेव सगट यांच्या घरी मासे घेण्यासाठी गेला होता. त्या ठिकाणी कोणी नसताना अविनाश घरात गेला असता विमल निवृत्ती सगट हिने त्याला पाहून आरडा ओरडा केला. त्यामुळे घाबरून अविनाश तिथून पळाला. यानंतर विमल सगट हिने हा प्रकार तिच्या पुतण्यास सांगितला.
प्रशांत निवृत्ती सगट याने अविनाशचा शोध घेतला असता, देवळा ते सारसा जाणाऱ्या रोडवर तो सापडला. त्याठिकाणी प्रशांत सगट याने त्यास मारहाण केली. यावेळी ऋषिकेश खंडू सगट, प्रितम लाला शिंदे, कुलदीप सुभाष सगट, विजय दशरथ पारवे व अमर सुभाष सगट हेही तेथे आले. त्यांनीही हातातील काठ्यांनी पायावर व डोक्यात मारहाण केली. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महादेव पिराजी बलाढये यालाही त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. कुटुंबीयांनी ही बाब गावात समजुतीने मिटवली म्हणून त्यावेळी पोलिसात तक्रार केली नाही.
दुसऱ्या दिवशी पुन्हा मारहाण
दुसऱ्या दिवशी, दिनांक 16 जुलै रोजी वैभव सगट व ऋषिकेश सगट यांनी अन्य दोघांच्या सोबतीने अविनाशला पुन्हा जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून अंजनपूर कोपऱ्याच्या दिशेने नेले. त्यांनी अविनाशला धानोरा (खुर्द) गावाजवळील कॅनलवर नेऊन बांबूच्या काठ्यांनी, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. त्याचा शरीरभर मार लागून व पोटात गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी अविनाशला दुचाकीवर टाकून गावाकडे आणले. यावेळी वैभव सगट याने केशरबाईंना धमकावत सांगितले, “हे काहीच नाही, दोन दिवसांत काय करतो ते बघा.”
दरम्यान, रात्री प्रकृती खालावल्याने अविनाशला अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दिनांक 17 जुलै रोजी पहाटे 1.45 वाजता त्याचा मृत्यू झाला.
सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात केशरबाई सगट यांच्या फिर्यादीवरून वैभव नामदेव सगट, ऋषिकेश खंडू सगट, प्रितम लाला शिंदे, कुलदीप सुभाष सगट, प्रशांत निवृत्ती सगट, विजय दशरथ पारवे आणि अमर सुभाष सगट (सर्व रा. देवळा, ता. अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.