Breaking

भोंदूबाबा खरात प्रकरणी माकपची जिल्हाभर निदर्शने

Updated: एप्रिल 6, 2026

By Vivek Sindhu

संपर्कातील सर्वांवर कठोर कारवाईची मागणी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

संपर्कातील सर्वांवर कठोर कारवाईची मागणी

बीड – भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारस्थानात महिला आयोगाच्या अध्यक्षांसह अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी सामील झालेले किंवा बळी पडलेले उघड होत असताना देशात आणि राज्यात ज्या विचाराचे सरकार आहे त्यामुळे श्रद्धेच्या नावाखाली अशा अंधश्रद्धांना पाठबळ व  प्रतिष्ठा मिळाली आहे. बुवाबाजीला शरण गेलेल्या संविधानिक पदावरील व्यक्तीविरोधात कारवाई करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सोमवार दि 6 रोजी जिल्हाधर निदर्शने केली.

राज्यात सध्या तंत्र-मंत्र, अंगारे-धुपारे करून अडचणीत सापडलेल्यांचे व महिलांचे  शोषण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या अशोक खरात या बुवा-बाबाने याद्वारे केलेल्या शोषणाला महिला  व सामान्य लोक मोठ्या प्रमाणात बळी पडले आहेत. अशोक खरात याच्या या कारस्थानात महिला आयोगाच्या अध्यक्षांसह अनेक मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी एकतर सामील आहेत किंवा बळी पडलेले आहेत. संविधानिक पदांवर व अधिकारांवर असलेल्या या लोकप्रतिनिधींनी व अधिकाऱ्यांनी संविधानाला अभिप्रेत असलेला वैज्ञानिक दृष्टीकोन स्वत:मध्ये अंगिकारला पाहिजे. समाजातही तो रुजविला पाहिजे. मात्र असे करण्या ऐवजी ते स्वत:च अंधश्रध्दांचे एकतर समर्थक बनत असल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बीड शाखेने भोंदू बाबा अशोक खरात व त्याच्या सर्व  साथीदारांवर कठोर कारवाई करा. अशोक खरात याची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्ध निर्मूलनाच्या  कामासाठी उपयोगात आणा. अंधश्रद्धा व संतापजनक शोषणाच्या या प्रकरणामध्ये ३९ आमदार सामील असल्याचे समोर येत आहे. या ३९ आमदारांची नावे  जाहीर करा. त्यांच्या सहभागाचे स्वरूप जनतेला समजावे अशाप्रकारे ते सार्वत्रिक करा. अशा आमदारांचे तत्काळ राजीनामे घ्या. अशोक खरात याच्या शोषणाला बळी पडलेल्या अनेक महिलांचे वाईट व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे बळी पडलेल्या महिलांच्या सामाजिक प्रतिष्ठेला ठेच पोहोचत आहे. असे व्हिडिओ समाज माध्यमांतून तातडीने हटवा. भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करत असतानाच त्याला समर्थन देणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींवर व विविध मार्गाने त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्वांवर कठोरातील कठोर कारवाई करा.  अशोक  खरात याच्याबरोबरच इतरही अनेक गावागावांमध्ये सध्या भोंदू बाबांचे उदंड पीक आले आहे. राज्यकर्त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकवादाचा पाठपुरावा करण्याऐवजी जाती आणि धर्म आधारित द्वेषवादी अंधश्रद्ध राजकारणाला बळ दिल्याचा हा परिणाम आहे. राज्य सरकारच्या वतीने  राज्यातील या सर्व भोंदू बाबांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवा. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करून ते कार्यान्वित करण्याचा शासन निर्णय त्वरित अमलात आणा. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून या  कायद्याची कठोर अंमलबजावणी करा. सोशल मीडियातून होणाऱ्या बाबा-बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या जाहिरातींवर बंदी आणा. अशा जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तयार करा.या मागणी करिता बीड जिल्हा सचिव कॉ.ऑड.अजय बुरांडे व जिल्हा कमिटी मार्फत जिल्हयातील अंबाजोगाई, धारूर, परळी, माजलगाव, सिरसाळा निदर्शने करण्यात आली.


Categories

Recent Posts