Breaking
Updated: एप्रिल 11, 2026
खंडणी प्रकरणात रेखा वंजारे यांना अंबाजोगाई न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: राज्यभरात नावाजलेल्या यश कन्स्ट्रक्शन कंपनीकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असलेल्या रेखा उत्तम वंजारे यांना अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलासा दिला असून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात रेखा वंजारे यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांच्या न्यायालयात पार पडली. आरोपीच्या वतीने ॲड. नितीन जाधव यांनी मांडलेला प्रभावी आणि समर्पक युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथील रहिवासी असलेल्या रेखा उत्तम वंजारे यांनी यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात शासकीय कार्यालयात विविध तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी आणि त्यासंदर्भातील चौकशी मागे घेण्यासाठी त्यांनी कंपनीकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. अटकेची शक्यता निर्माण झाल्याने आरोपी रेखा वंजारे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर सुनावणी दरम्यान आरोपीच्या वतीने प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. नितीन जाधव यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे आणि वस्तुस्थिती विचारात घेऊन न्यायालयाने रेखा वंजारे यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या कायदेशीर प्रक्रियेत ॲड. नितीन जाधव यांना ॲड. राजकुमार चौरे, गुंडाप्पा बुरकुले आणि बाळासाहेब गायके यांनी सहकार्य केले. या निकालामुळे सदर खंडणी प्रकरणात आरोपीला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.