Breaking

अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी, पालकांच्या हातात बेडी!

Updated: जानेवारी 3, 2026

By Vivek Sindhu

बीड पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा

बीड: जिल्ह्यातील शाळा आणि कोचिंग क्लासेसला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातात पालकांनी वाहने दिल्यास आता थेट पालकांवरच गुन्हे दाखल होणार आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या संदर्भात कडक आदेश जारी केले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पालकांना ३ वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा भोगावी लागू शकते. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी १८ वर्षांखालील मुले परवाना नसतानाही दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये केवळ मुलांवरच नाही, तर त्यांच्या पालकांवर ‘भारतीय न्याय संहिता’, ‘मोटर वाहन कायदा’ आणि ‘जेजे ॲक्ट’च्या विविध कलमान्वये कारवाई केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने २५ हजार रुपयांचा दंड आणि ३ वर्षांपर्यंतच्या सश्रम कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

या कारवाईचे परिणाम केवळ दंडापर्यंत मर्यादित नसून, संबंधित मुलांच्या भविष्यावरही याचा मोठा परिणाम होणार आहे. जर एखाद्या अल्पवयीन मुलावर वाहतूक नियमांच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला, तर त्याला वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन परवाना (License) मिळणार नाही. तसेच भविष्यात नोकरी, पासपोर्ट किंवा चारित्र्य प्रमाणपत्र मिळवताना अडचणी निर्माण होऊ शकतात. अपघाताच्या स्थितीत विम्याचा दावाही फेटाळला जाणार असल्याने पालकांनी गंभीर दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षकांनी शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांचे समुपदेशन करावे आणि हा संदेश पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पोहोचवावा. अल्पवयीन मुलांसाठी सायकल किंवा ई-सायकल हा सुरक्षित पर्याय असल्याचेही पोलिसांनी सुचवले आहे.


Categories

Recent Posts