परळी : तालुक्यातील कौडगाव हुडा गावाजवळ रविवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. ममदापूर–बोरखेड मार्गावरील कौडगावहुडा जवळ पुलावरून जात असताना चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चार तरुण होते. त्यापैकी तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर, एक तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. परळी मतदार संघाचे आ. धनंजय मुंडे रात्रीपासून प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांच्या सूचनेनुसार बचावकार्यासाठी पुणे येथून एनडीआरएफचे पथक तातडीने बोलावण्यात आले आहे.
आ. धनंजय मुंडे यांनी यंत्रणा केली सतर्क; पुणे येथून एनडीआरएफचे पथक बोलावले
ही घटना रात्री अबारा वाजताच्या सुमारास घडली. जोरदार पावसामुळे कौडगावहुडा गावाजवळ असलेल्या छोट्या ओढ्याला मोठा पूर येऊन नदीचे स्वरूप आले. यावेळी कारमधून जात असलेल्या तरुणांना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही, त्यांना पुलावरून गाडी जाईल असे वाटले आणि त्यांनी गाडी पुलावर चढवली. मात्र, पाण्याच्या जोरदार वेगाने कार वाहून गेली. प्रसंगावधान राखून त्यांनी कारमधून उड्या मारल्या आणि पात्रातील झाडावर चढून बसले. त्यापैकी अमर पौळ (२५), राहुल पौळ (३०) रा. डिग्रस व राहुल नवले (२३) रा. पुणे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहेत. मात्र विशाल बल्लाळ रा. पुणे हा तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. पुराच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने बचावकार्य अधिक कठीण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे ठाणेप्रमुख दहीफळे यांच्यासह एसडीओ, डीवायएसपी, तहसीलदार व एपीआय यांनी घटनास्थळी दाखल होत रात्रीपासून त्यांचे बचावकार्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. गावकऱ्यांनीही प्रशासनाला मदत सुरू केली आहे.
आ. धनंजय मुंडेंची तत्परता
या गंभीर घटनेनंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यरात्रीपासूनच यंत्रणा सतर्क केली. विभागीय आयुक्त पापळकर व जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी संपर्क साधून पुणे येथून एनडीआरएफचे पथक बोलावण्यात आले आहे. तसेच आवश्यक असल्यास एसडीआरएफची टीम किंवा हेलिकॉप्टर मदतीसाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. आ. मुंडे यांनी स्वतः या घटनेवर लक्ष ठेवले असून त्यांचे कार्यालय प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे.
घटनास्थळी राजाभाऊ पौळ, दिग्रसचे सरपंच सुभाष नाटकर यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. मुसळधार पावसामुळे अडथळे येत असले तरी प्रशासन आणि गावकरी जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून बेपत्ता युवकाचा शोध लवकर लागावा यासाठी प्रार्थना केली जात आहे.