Breaking

बीडच्या महिला डॉक्टरची साताऱ्यात आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये परळीच्या पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

Updated: ऑक्टोबर 24, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 10 24 at 14.47.35 37ad1561

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या वरिष्ठ महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे (मूळ रा. कोठरबन, ता. वडवणी, जि. बीड) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली असून त्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचे आणि प्रशांत बनकर या व्यक्तीने मानसिक त्रास दिल्याचे नमूद आहे. या घटनेमुळे वैद्यकीय व पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मयत डॉक्टर काही महिन्यांपासून पोलीस व आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीप्रकरणी पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्या विरोधात चौकशी सुरू होती. या तणावामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.

सुसाईड नोट मिळाल्यानंतर फलटण सिटी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(N), 108 प्रमाणे गुन्हा नोंदवला आहे. आरोपी गोपाळ बदने हा मुळचा परळी तालुक्यातील असून सध्या फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आता त्याला त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर फरार असून, त्यांच्या अटकेसाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची माहिती घेत आरोपी अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आणि दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

मयत डॉक्टरच्या काकांच्या मते, “तिला अनेकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात होता. याबाबत डीवायएसपींकडे तक्रारही केली होती, पण काहीच कारवाई झाली नाही. सततचा त्रास होत असल्याचे ती सांगायची. याच कारणाने तिने आत्महत्येचा निर्णय घेतला,” असे त्यांनी सांगितले.

फलटण येथील हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. हातावर लिहिलेल्या मजकुराला महत्त्वाचा पुरावा मानून तपास सुरू आहे.

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले की, “आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंबनाची कारवाई पूर्ण झाली असून तपास निष्पक्षपणे होईल.”या घटनेमुळे डॉक्टरांच्या आत्महत्येच्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्याचाच सहभाग असल्याचा आरोप झाल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत असून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.


Categories

Recent Posts