Breaking
Updated: जानेवारी 31, 2026
अंबाजोगाईत भरवस्तीत घरफोडी; ११ लाखांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहरातील बाराभाई गल्ली परिसरातील एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचे घर चोरट्यांनी लक्ष केले असून, भरवस्तीत झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ११ लाख ७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही संपूर्ण घटना घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलीस आता त्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी मोहम्मद अलीमुद्दीन करीमुद्दीन (वय ६५) यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद अलीमुद्दीन यांचा किराणा मालाचा व्यवसाय असून ते आपल्या कुटुंबासह एपीजे पार्क शादीखाना शेजारी राहतात. दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ते आपल्या कुटुंबासह पाथरी येथे मुलाच्या घराचे बांधकाम पाहण्यासाठी गेले होते. घर कुलूपबंद असल्याचे पाहून चोरट्यांनी २९ जानेवारीच्या मध्यरात्री १:२५ वाजेच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला.
दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांच्या दुकानातील कामगाराने घर उघडे असल्याचे फोनवरून कळवल्यानंतर ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी घरातील कपाटे फोडून सोन्याचे गंठण, नेकलेस, अंगठ्या, बांगड्या आणि चेन असे सुमारे ८ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच कपाटात ठेवलेली ४ लाख रुपयांची रोकडही चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४), ३०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद बाबुराव जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे हे करत आहेत.