Breaking
Updated: ऑक्टोबर 11, 2025
बीड जिल्ह्यात सहाव्या गुन्हेगार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत प्रयत्नशील
बीड – बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि गुंडगिरीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या नेतृत्वाखाली आणखी एक निर्णायक कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सहाव्या गुन्हेगार टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
ही टोळी दरोडा, घरफोडी, चोरी, दरोड्याची तयारी आणि अवैध शस्त्र बाळगणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांत गुंतलेली होती. बीड, धाराशिव, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांत त्यांनी तब्बल ११ गुन्हे केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
नेकनूर पोलिस ठाण्यात २३ मे २०२५ रोजी दाखल गुन्हा क्रमांक ११७/२०२५ नुसार, लिंबागणेश परिसरात पवनचक्कीवरील तांब्याच्या वायरची चोरी करण्याच्या प्रयत्नात टोळीने १७ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान केले होते. यावेळी वॉचमनने बचावार्थ केलेल्या गोळीबारात आरोपी राजू काळे ठार झाला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी टोळी प्रमुख सुभाष भास्कर काळे (४४), बाबुशा भिमराव काळे (२५) आणि रामा ऊर्फ बिल्या शंकर काळे (२२) यांना जुलै महिन्यात अटक केली. आरोपींकडून ₹४.५० लाख किमतीची टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली. टोळीतील एक जण मयत असून तिघे फरार आहेत.
सपोनि चंद्रकांत गोसावी यांनी तयार केलेला प्रस्ताव बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी २ ऑक्टोबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे सादर केला होता. त्यास १० ऑक्टोबर रोजी मान्यता मिळाली आणि आरोपींवर मोक्का कायद्याची कलमे ३(१)(ii), ३(२), ३(४) लागू करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.