Breaking

भाऊबिजेच्या दुसऱ्याच दिवशी ऊसतोड कामगारांनी धरली कारखान्याची वाट

Updated: ऑक्टोबर 27, 2025

By Vivek Sindhu

भाऊबिजेच्या दुसऱ्याच दिवशी ऊसतोड कामगारांनी धरली कारखान्याची वाट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर तालुक्यातील अनेक गावे पडली ओस; विदारक स्थिती कधी बदलणार‎

धारूर – ग्रामीण भागात ऊसतोड मजुरांची संख्या अधिक असल्याने ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणुन धारूर तालुक्याची ओळख आहे. यंदा अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने खर्चा इतकेही उत्पादन झाले नाही. यामुळे आर्थिक संकटातच दिवाळीचा सण गोड करावा लागला. बहिणीच्या हातून ओवाळणी करुन घेत भावनाने भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवसीपासूनच कारखान्याची वाट धरली आहे. ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्यांनी प्रवास करत ऊसतोड कामगाराचे जत्थेच्या-जत्थे कारखान्याच्या दिशेने प्रवास करीत आहेत. यामुळे धारूर तालुक्यातील अनेक गावे माणसांअभावी ओस पडू लागली आहेत. आतापर्यंत तालुक्यातून जवळपा ७० हजार ऊसतोड मजुरांचे स्थलांतर झाले आहे.

दसरा-दिवाळीतच या ऊसतोड मजुराना कारखान्याचे बोलावणे आले आहे. त्यामुळे शेतातील कामे उरकून ऊसतोड मजुरांनी बिऱ्हाड बांधले आहे. शेतीची अनिश्चितेमुळे कुटूंबाच्या उदनिर्वाहासाठी काट्या-कुट्यांचा रस्ता तुडवडत ऊसतोडीसाठी कामगार कुटूंबासह सणासुदीतच घराबाहेर पडला आहे. महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यातील विविध साखर कारखान्यांमध्ये उसतोडणीच्या हंगामाला वेग आला असून, धारूर तालुक्यातील मजूर मोठ्या संख्येने या कामासाठी स्थलांतरित होत आहेत. सध्या खामगाव–पंढरपूर या मुख्य रस्त्यावर दररोज शंभर ते दीडशे ट्रॅक्टर आणि ट्रक उसतोडणी मजूर घेऊन दक्षिणेकडे रवाना होत आहेत. दिवसा प्रमाणेच रात्रीही हे स्थलांतर सुरू असल्याने रस्त्यांवर वाहनांची सततची वर्दळ सुरू आहे. काही कुटुंबे मुलाबाळांसह, जनावरे आणि घरसंसार घेऊन निघालेल्या या कुटूंबाकडे पाहणाऱ्यांचे डोळे पाणवत आहेत. आर्थिक अडचणीत मुकादमामार्फत कारखाना व्यवस्थापन उचल देवून मजुरांना बांधून ठेवते. त्यामुळे मन नसतानाही घेतलेल्या उचलीच परतफेड करण्यासाठी ऊसतोडीसाठी जावेच लागते. त्याच प्रमाणे िहवाळा आणि उन्हाळ्यात कुटंूबाचा उदरनिर्वाह भागवता येईल येवढा रोजगार गावात उपलब्ध होत नसल्याने पर्यायच उरत नाही. गावात आता केवळ आढळताहेत वृद्ध तसेच लहान बालके मुलगा-सुन , आई-वडील ऊसतोडीच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याने गावांमध्ये केवळ लहान शाळकरी मुले आणि वृध्द महिला पुरुष वास्तव्यास आहेत. शासनाने अशा मुलांच्या शिक्षणासाठी शाळांमध्येच त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आजी-आजोबा जवळ वास्तव्य करुन शिक्षण घेऊ शकतात. यासाठी धारूर तालुक्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. त्यांच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी गावो-गावी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

धारूर तालुक्यात उद्योग धंद्दे, नियमीत रोजगाराचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणच थांबते आणि जनता ऊसतोडी करत रानोमाळ फिरते. हे कुठे तरी थांबले पाहिजे आणि गावं समृध्द झाली पाहिजे यासाठी उद्योग धंद्याचा विकास आणि रोजगाराची उपलब्धता होणे आवश्यक आहे. परंतु धारुर तालुक्यातील सर्वसामान्य जनता मात्र गेले अनेक वर्षांपासून परिस्थितीत सुधारणा होण्याची आस लावून बसली असताना लोकप्रतिनिधी आणि शासन व प्रशासन मात्र भावनाशुन्य बनले असल्याने ऊसतोडीचा कोयता हातात घेऊन सणासुदीतच मजुरांना घराबाहेर पडावे लागते.


Categories

Recent Posts