Breaking

पाच वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अखेर अटकेत

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

बीड शहर डीबी पथकाची यशस्वी कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीड शहर डीबी पथकाची यशस्वी कारवाई

बीड : पाच वर्षांपासून फरार असलेल्या खुनाच्या आरोपीला बीड शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (डीबी) पथकाने अखेर अटक केली आहे. या कारवाईमुळे बीड पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे (रा. बीड) याच्यावर पोलीस ठाणे बीड शहर गु.र.नं. 165/2014 भादंवि कलम 302, 307, 504, 34, 201 या गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हा दाखल होता. २०१४ साली स्वतःच्या बहिणीसह तिच्या प्रियकराचा ठेचून खून केल्याच्या आरोपाखाली त्याला जन्मठेप व १०,००० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. या घटनेचा प्रकार ऑनर किलिंगचा असल्याचे स्पष्ट झाले होते.

मात्र, शिक्षा सुनावल्यानंतरही हा आरोपी पोलीसांच्या ताब्यातून फरार झाला होता. या संदर्भात पो.ठा. शिवाजीनगर, बीड येथे गु.र.नं. 781/2018 भा.दं.वि. कलम 224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर CRPC कलम 299 नुसार न्यायालयीन कार्यवाही प्रस्तावित होती. तसेच C-11040 जिल्हा शोधपत्र देखील तयार करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी अशा गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 17 जुलै 2025 रोजी पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ यांनी विशेष तपास पथक तयार केले. या पथकात पोउपनि महेश जाधव, पो.ह. गहिनीनाथ बावनकर, पो.अ. राम पवार यांचा समावेश होता.

या तपास पथकाने सतर्कता राखत कामगिरी बजावत अखेर फरारी आरोपी विठ्ठल उर्फ सोनू काळवणे यास शोधून अटक केली आहे. सदर आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी तपास पथक व मार्गदर्शक अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.