Breaking
Updated: डिसेंबर 10, 2025
बीड स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
बीड: केज आणि धारुर तालुक्यात दिवसा बंद घरांची रेकी करून धाडसी घरफोड्या करणाऱ्या एका आंतरजिल्हा चोरट्याला बीड स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातून येऊन बाप-लेक मिळून या चोऱ्या करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आरोपीकडून २९ ग्रॅम सोने आणि ५ तोळे चांदी हस्तगत केली आहे.
दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी केज तालुक्यातील खाडेवाडी येथील फिर्यादी संभाजी बन्सी खाडे हे बाहेरगावी गेले असताना त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. तत्पूर्वी, १७ नोव्हेंबर रोजी धारुर तालुक्यातील केज रोडवरील बालाजी सांभराव पिलाजी यांच्या घरीही अशाच प्रकारे दिवसा घरफोडी झाली होती. या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, हे गुन्हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळुंज पारगाव येथील अक्षय काळे आणि त्याचे वडील अस्तांदुर काळे यांनी केल्याचे समजले.
या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ वाळुंज पारगाव येथे सापळा रचला. तेथे संशयित अक्षय अस्तांदुर काळे (वय २२) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपले वडील अस्तांदुर काळे याच्या मदतीने केज व धारुर येथे चोऱ्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून घरफोडीतील २९ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५ तोळे चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, केजचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, हवालदार महेश जोगदंड, राजू पठाण, भागवत शेलार, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, राजू वंजारे व पथकाने पार पाडली.