Breaking

बालझुंबडचा समारोप ; समुह नृत्य स्पर्धेस विद्यार्थी संघांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated: जानेवारी 10, 2026

By Vivek Sindhu

बालझुंबड हा माईलस्टोन - मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बालझुंबड हा माईलस्टोन – मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाच्या वतीने प्रति वर्षाप्रमाणे यावर्षीही सलग २६ व्या बालझुंबड मधील समुह नृत्य स्पर्धा शुक्रवार, दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती. समुह नृत्य स्पर्धेने यावर्षी बालझुंबडचा समारोप झाला. संयोजक तथा मंडळाचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी व बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित समुह नृत्य स्पर्धेत एकूण ३६ विद्यार्थी संघांनी विविध विषयांवर आधारित गीतांवर आपले बहारदार सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऍड.दयानंद लोंढाळ हे तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक महेश कदम, पत्रकार प्रतिक कांबळे (आयोजक, चंपावती महोत्सव, बीड.), सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले आणि परिक्षक म्हणून नृत्य विशारद आकांक्षा ढगे, नृत्य विशारद साक्षी विडेकर, प्रशांत कुमार (प्राचार्य, न्यु व्हिजन पब्लिक स्कूल.) यांची उपस्थिती होती. पुज्य सानेगुरूजी यांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्ज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मान्यवरांचा सत्कार संयोजक समितीच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रख्यात पत्रकार प्रतिक कांबळे यांनी सांगितले की, बीड जिल्हा हा कलाकारांचा बालेकिल्ला तर अंबाजोगाई ही खाण आहे. बालझुंबड हे एक चांगले व्यासपीठ आहे. आजकाल आपल्या मुलांनी खूप शिकून डॉक्टर, इंजिनिअर झाले पाहिजे याकडे पालकांचा ओढा दिसून येतो. पण, मी अशा पालकांना सांगू इच्छितो की, आपण मुलांना खूप शिकवा, परंतु, मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव द्या, त्यांना कलाकार बनायला प्रोत्साहन द्या, प्रत्येक मुला व मुलीच्या अंगी एखादी कला हवी, कारण, ज्याच्या अंगी एखादी कला असते तो भविष्यात आपले आयुष्य आनंदाने जगू शकतो. कला माणसाच्या अंतर्मनाचा ठाव घेते. आजचे परिक्षक हे बालझुंबडचे माजी विजेते आहेत. संयोजक पापा मोदींच्या संकल्पनेतून मागील २५ वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला बालझुंबड हा उपक्रम अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा जोपासणारा आहे असे गौरवोद्गार पत्रकार कांबळे यांनी काढले. तर यावेळी बोलताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले म्हणाले की, बालझुंबड हा माईलस्टोन उपक्रम आहे. पापा मोदी यांची प्रेरणा व दिनकर जोशी यांची संकल्पना आणि संयोजन समितीचे उत्तम टीमवर्क यामुळे हा उपक्रम आगळ्यावेगळ्या उंचीवर पोहचला आहे. बालझुंबड हे एक सक्षम व्यासपीठ आहे. येथे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. जीवन आनंदाने जगण्यासाठी कलागुण आवश्यक असतात. त्यामुळे स्पर्धक विद्यार्थ्यांनी आपले कलागुण ओळखून ते जोपासत पुढे जावे आणि आनंदी आयुष्य जगावे असे आवाहन करून डॉ.इंगोले यांनी बालझुंबड समुह नृत्य स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नगरसेवक महेश कदम यांनी सांगितले की, मागील २५ वर्षांपासून मोदी साहेबांच्या प्रेरणेतून अव्याहतपणे सुरू असलेल्या बालझुंबडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकास घडवून आणणे, प्रगतीसाठी हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. समुह नृत्य स्पर्धेतून विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांनी स्पर्धेत यश प्राप्त करावे आणि विविध क्षेत्रात करिअर करण्यासाठी ज्ञान संपादन करावे, मुलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन नगरसेवक कदम यांनी केले. तर अध्यक्षीय समारोप करताना ऍड.दयानंद लोंढाळ यांनी सांगितले की, बालझुंबड ही स्पर्धा सातत्याने २६ वर्षे होत आहे. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवण्यासाठी बालझुंबड सारख्या स्पर्धा दिशादर्शक ठरतात. संयोजक राजकिशोर मोदी, सांस्कृतिक विभागप्रमुख दिनकर जोशी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या संकल्पनेतून हा अभिनंदनीय उपक्रम सुरू असल्याचे सांगून भविष्यात बालझुंबड मधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कलावंत, खेळाडू, चित्रकार, वैज्ञानिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करून बालझुंबडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा, याकरिता हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. बालझुंबड म्हणजे अंबाजोगाई तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचे एकत्रित स्नेहसंमेलन होय. त्यामुळे पालकांनी यापुढेही असाच प्रतिसाद देवून बालझुंबड स्पर्धा यशस्वी करावी अशी अपेक्षा ऍड.लोंढाळ यांनी व्यक्त केली. बालझुंबड २०२६ समुह नृत्य स्पर्धा उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार समन्वयक राजेश कांबळे यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समन्वयक राजेश कांबळे, मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य विनायक मुंजे, पाटील मॅडम, संध्या सोळंके, सोमवंशी सर, मंगेश बलुतकर, सय्यद शफीक, खरात सर, विजय तट, विकास शिंदे यांच्यासोबत प्रियदर्शनी क्रीडा, सांस्कृतिक व व्यायाम मंडळाचे पदाधिकारी विजय रापतवार, सचिन जाधव, विशाल जगताप यांनी परिश्रम घेतले.

समुह नृत्य स्पर्धेत बहारदार सादरीकरण :
विद्यार्थ्यांनी आपल्यातील सांघिक कलागुणांना वाव देत समुह नृत्य स्पर्धेत विविध प्रकारच्या गीतांवर आधारित नृत्य सादर केले. यात मुलींचा मोठा सहभाग होता. ही स्पर्धा शुक्रवारी तीन गटात आयोजित करण्यात आली होती. समुह नृत्य स्पर्धेत एका शाळेतील गटनिहाय एकच संघ सहभागी झाला होता. प्रत्येक स्पर्धक संघाला त्यांच्या सादरीकरणासाठी ५ मिनिटांचा अवधी दिला होता. यात अनेक स्पर्धकांनी आकर्षक पेहराव करून आपले नृत्य आविष्कार सादर केले. इयत्ता १ ली ते इयत्ता ४ थी या गटासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत १० स्पर्धक संघ, इयत्ता ५ वी ते इयत्ता ७ वी या गटात १६ स्पर्धक संघ आणि इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी या गटात १० स्पर्धक संघ सहभागी झाले. तीनही गटांत एकूण ३६ स्पर्धक संघ सहभागी झाले. समुह नृत्य या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.


Related Posts :

Categories

Recent Posts