Breaking

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा – ‘मनसे’ने अंबाजोगाईत दिले निवेदन

Updated: सप्टेंबर 23, 2025

By Vivek Sindhu

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करा - 'मनसे'ने अंबाजोगाईत दिले निवेदन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिके वाहून गेली, जनावरे दगावली आणि घरे कोसळली. या परिस्थितीत शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

मा. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसेच्या वतीने अंबाजोगाई तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. यात अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली. जिरायत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख, बागायती शेतकऱ्यांना दीड लाख आणि फळबाग शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्याचे आवाहन करण्यात आले. पावसात मृत्यू झालेल्या किंवा वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाखांची आर्थिक मदत आणि एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

पावसाने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना चार लाखांची मदत द्यावी, घरांची पडझड झालेल्यांना घरकुल योजनेतून प्राधान्याने घरे उपलब्ध करून द्यावीत तसेच पुरात वाहून गेलेल्या जनावरांच्या भरघोस नुकसानभरपाईचे निर्देश शासनाने द्यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

या प्रसंगी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष सुनील जगताप, शहराध्यक्ष गणेश अप्पा बरदाळे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष श्री. कुलकर्णी, शहराध्यक्ष अमोद कुलकर्णी, रुद्र जाधव, हर्ष चाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


Categories

Recent Posts