Breaking
Updated: नोव्हेंबर 1, 2025
अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक पूर्व आढावा बैठक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची निवडणूक पूर्व आढावा बैठक
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या प्रामाणिक, निष्ठावान अशा सर्व कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी व त्यांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आम्ही उभे राहू. तसेच आगामी निवडणुकीत बीड जिल्हा परिषद, सर्व पंचायत समिती आणि नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चा झेंडा फडकविणार असल्याचा विश्वास बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. ते अंबाजोगाईत पक्षाच्या निवडणूक पूर्व आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईत ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शहरातील राजस्थानी मंगल कार्यालयात खा.बजरंग सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, तर यावेळी माजी आमदार प्रा.संगिताताई ठोंबरे, राजेसाहेब देशमुख आणि डॉ.नरेंद्र काळे, तालुकाध्यक्ष अमर देशमुख, संजय भोसले, तारेख अली उस्मानी, ऍड.शहाजान पठाण, अंकुश ढोबळे, ऍड.इस्माईल गवळी, दीपक शिंदे, केशव ढगे, भास्कर आगळे, देविदास देवकते, तानबा लांडगे, आश्रूबा करडे, पप्पू माके, ज्ञानोबा कांबळे, रविंद्र मोरे, गणेश घाडगे, चंद्रकलाताई देशमुख, बन्सी जोगदंड, व्यंकटेश चामनर, कल्याण भिसे, मुनीर कुरेशी, सोमनाथ धोत्रे, सुधाकर देशमुख, प्रशांत पवार, अशोक मोदी, कार्याध्यक्ष टेकाळे, सुरैय्याभाभी चौधरी, पप्पू काकडे, दिलीप धुमाळ, धनराज माने, सुधाकर जोगदंड, अशोक जाधव, अन्वर कुरेशी, राजेभाऊ देवकते या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक करताना तालुकाध्यक्ष अमर देशमुख म्हणाले की, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये तरूणांना ५० टक्के संधी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि रणनीती ठरविण्यासाठी आज पक्षातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बप्पा, संगीताताई, साठे साहेब, राजेसाहेब ही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्ती असतानाही त्यांनी मोठी उंची गाठली असून जशी तुमची पाने तुम्ही लिहिली तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होतकरू, प्रामाणिक व ज्यांना कुठलाही राजकीय वारसा नाही अशा नविन चेहऱ्यांना त्यांची पाने त्यांना लिहिण्याची संधी आपण साऱ्या मंडळींनी आम्हाला मिळवून द्यावी अशी विनंती तालुकाध्यक्ष देशमुख यांनी व्यक्त केली. तर यावेळी बोलताना बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा म्हणाले की, लोकसभेत माझ्या आणि विधानसभेत पृथ्वीराज साठे यांच्या निवडणुकीत बीड व अंबाजोगाईकरांनी जे मताधिक्य दिले. ते मी कदापिही विसरू शकणार नसून आता वेळ आली आहे. ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची आणि त्यामुळेच होऊ घातलेल्या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी-ज्यांनी पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेतले अशा सर्व कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांना ताकद देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने आम्ही उभे राहू. निवडणुक रिंगणात उतरण्यापूर्वी महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून जर युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावरही निवडणूक लढविण्याची तयारी असून अंबाजोगाई नगरपालिका आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत असा विश्वास खा.सोनवणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले की, या सरकार मध्ये काय चालले आहे. बीड जिल्ह्याची काय परिस्थिती आहे. हे सर्वांना माहित आहे, शेतकरी उध्वस्त झाला आहे. सर्व जनतेच्या अपेक्षा आपल्याकडूनच आहेत. या तालुक्यात नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आमच्या अपेक्षा पूर्ण कराल अशी विनंती यावेळी त्यांनी बजरंग बप्पा सोनवणे यांना केली.याप्रसंगी प्रा.संगीताताई ठोंबरे, राजेसाहेब देशमुख व डॉ.नरेंद्र काळे, व्यंकटेश चामनर यांच्यासह अनेकांनी समायोचित विचार व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अंबाजोगाई शहराध्यक्षपदी ऍड.इस्माईल गवळी यांची निवड करण्यात आली. बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंबाजोगाई शहर व तालुक्यातील, पदाधिकारी, पुरूष, महिला कार्यकर्त्या, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचलन सुधाकर देशमुख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष ऍड.इस्माईल गवळी यांनी मानले.
*इच्छुक उमेदवारांना आवाहन :*
अंबाजोगाई नगरपरिषद, तालुक्यातील पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य पदांसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना कळविण्यात येते की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने उमेदवारी अर्ज रीतसर स्वीकारले जात आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पक्षाच्या ठरलेल्या नियमावलीनुसार व निर्धारित प्रक्रियेनुसार भरावेत व शनिवार, दिनांक १ नोव्हेंबर ते बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत अर्ज सादर करावेत. अर्ज मिळण्याचे व दाखल करण्याचे ठिकाण कार्यालय, शहर पोलीस स्टेशन समोर, नगरपरिषद कॉम्प्लेक्स, अंबाजोगाई (जि.बीड.) हे आहे.