Breaking

अंबाजोगाई तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Updated: सप्टेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 09 15 at 12.33.35 334b9a59

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

राक्षसवाडी व केकाणवाडीतील पाझरतलाव फुटले, शेतीचे मोठे नुकसान

हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून वाहतूक ठप्प झाली आहे. 

दोन पाझरतलाव फुटले

राक्षसवाडी येथे पाझरतलाव फुटल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. राक्षसवाडी आणि बोधेगाव परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून मोठे नुकसान झाले आहे. तर, राक्षसवाडी येथील आणखी एका तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. तसेच केकानवाडी (ता. केज) येथेही पाझरतलाव फुटून खालच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या या पाण्यामुळे शेतं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शेतीचे प्रचंड नुकसान, संपर्कमार्ग ठप्प 

राजेवाडी ते डोंगर पिपळा मार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे. अंबाजोगाई-मांडवा पठाण मार्गावरील वान नदीला आलेल्या पुरामुळे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून परिसरातील गावांचा संपर्क खंडित झाला आहे. धारूर–आडस रोडवर पाणी साचल्याने रस्ता बंद झाला आहे. चिचखंडी गावाजवळील वान नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून मोरफळी-आडस मार्गावरील पूल तर वाहून गेला आहे. सदर पुलाजवळ विहिरीचे काम सुरू असताना एक ट्रॅक्टर पुराच्या पाण्यात वाहून गेला.  मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने सांगितले. माकेगाव शिवारातील अनेक शेतं पाण्याखाली गेली आहेत.

आ. नमिता मुंदडा यांच्या सूचना, प्रशासन अलर्ट मोडवर

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार नमिता मुंदडा प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवून आहेत. त्यांनी बाधित ग्रामस्थांना मदत मिळावी यासाठी तातडीने सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तहसीलदार विलास तरंगे यांनी स्वतः दौरा करून नुकसानीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

मांजरा प्रकल्पाच्या सहा दरवाज्यातून विसर्ग सुरु

धनेगाव येथील मांजरा प्रकल्प पुरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस झाल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरणाच्या सांडव्यातून 6988.55 क्युसेक्स (197.92 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकानुसार विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येईल. नदीकाठावरील गावांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Categories

Recent Posts