Breaking

अंबाजोगाई शहराला मिळणार स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा

Updated: नोव्हेंबर 5, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाई शहराला मिळणार स्थिर आणि अखंडित वीजपुरवठा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

महावितरणच्या विद्युत कामांसाठी सव्वा कोटींचा निधी मंजूर; आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश

अंबाजोगाई : शहराच्या वीज पुरवठ्यातील पायाभूत सुविधा बळकटीसाठी मोठा टप्पा पार पडला आहे. जिल्हा नियोजन समिती (DPC) वार्षिक कार्यक्रम 2025 अंतर्गत आ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रयत्नांना यश मिळत 1 कोटी 20 लाखांचा निधी अंबाजोगाई शहरासाठी महावितरणच्या विविध विकासकामांसाठी मंजूर झाला आहे. त्यामुळे शहरातील भारनियमन, कमी व्होल्टेज, तांत्रिक अडचणी यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मंजूर कामांमध्ये शहरातील प्रमुख भागांमध्ये नवे रोहित्र बसविणे तसेच विद्यमान रोहित्रांची क्षमता वाढविणे याचा समावेश आहे. सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गवळीपुरा, मुंदडा डीपी, फॉलोवर्स कॉलनी, बेजगेमवार डीपी, गॅस गोडाऊन, एसबीआय बँक परिसर, थोरात डीपी, महाराष्ट्र बँक, मिल्लत नगर, ओल्ड मोदी डीपी, तथागत चौक, योगेश्वरी नगरी, सिद्धार्थ नगर, बालाघाट नगर आणि मुकादम डीपी (पोखरी रोड) या ठिकाणी विविध क्षमतेचे नवे ट्रान्सफॉर्मर बसविणे आणि जुन्यांची क्षमता वाढविणे यात येते.

या कामांमुळे वीज वितरण व्यवस्था मजबूत होऊन नागरिकांना अधिक स्थिर, दर्जेदार आणि सातत्यपूर्ण पुरवठा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरातील वाढत्या गरजेनुसार हा निधी विकास प्रक्रियेस गती देणार असून औद्योगिक, व्यापारी व निवासी विभागांना याचा थेट लाभ होणार आहे.

हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.

आ. नमिता मुंदडा यांनी शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यातील हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून पुढील काळात उर्वरित पायाभूत प्रकल्पांसाठीही निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.


Categories

Recent Posts