Breaking
WhatsApp Group
Join Nowहैदराबाद : जगभरात तंत्रज्ञान उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या वाढत्या प्रभावामुळे 2025 हे वर्ष नोकरकपातीच्या मोठ्या लाटेचं ठरत आहे. विविध आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत आयटी कंपन्यांनी आपल्या कामकाजात फेरबदल करत तब्बल 1 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. मायक्रोसॉफ्ट, इंटेल, गूगल, इन्फोसिस आणि आयबीएम या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी AI आधारित कार्यक्षमता वाढविण्यासाठी व खर्च नियंत्रणासाठी ही पावले उचलली आहेत.
मायक्रोसॉफ्टने पुन्हा नोकरकपात केली
मायक्रोसॉफ्ट कंपनीने यावर्षी दुसऱ्यांदा मोठी नोकरकपात करत सुमारे 9,100 कर्मचाऱ्यांना सेवा मुक्त केलं आहे. याआधी मे महिन्यात 6,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं होतं. कंपनीने सांगितलं की, ही कपात त्यांच्या जागतिक कामगार संख्येच्या 4 टक्क्यांपेक्षा कमी आहे. बदलत्या व्यावसायिक गरजांनुसार ऑपरेशन्समध्ये सुधारणेसाठी ही कारवाई केल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं.
इंटेलमध्ये 20 टक्क्यांपर्यंत कपात
इंटेल कंपनीने उत्पादन व खर्च नियंत्रणाच्या दृष्टीने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष नागा चंद्रशेखरन यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या आंतरिक संदेशात ही माहिती देण्यात आली असून, ही प्रक्रिया जुलै 2025 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
इन्फोसिसने नवख्या कर्मचाऱ्यांना कमी केलं
भारतीय आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने अंतर्गत मूल्यांकनात अपयशी ठरलेल्या 240 नव्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलं आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही 300 कर्मचाऱ्यांना याच कारणामुळे सेवा मुक्त करण्यात आलं होतं. या कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सिस्टम इंजिनीअर्स आणि डिजिटल स्पेशालिस्ट इंजिनीअर्स यांचा समावेश आहे.
गूगल टीव्ही विभागातही कपात
गूगल कंपनीने एप्रिल महिन्यात आपल्या गूगल टीव्ही विभागातील सुमारे 25 टक्के कर्मचाऱ्यांना कमी केलं आहे. याआधी विभागाच्या एकूण खर्चात 10 टक्क्यांची कपात करण्यात आली होती. सदर विभागात सुमारे 300 कर्मचारी कार्यरत होते.
नवीन तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्ट
AI आणि ऑटोमेशनमुळे उद्योग क्षेत्रात कार्यपद्धतीत मोठे बदल होत असून, याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या संख्येवर दिसून येतो आहे. भविष्यात उद्योगांची कार्यपद्धती अधिक तंत्रज्ञानाधिष्ठित आणि परिणामकारक होणार असली तरी, त्याचा फटका मानव संसाधन व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Last Updated: July 5, 2025