Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

शिरूर, पाटोदा आणि आष्टी तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; ३२ जण पुरात अडकले

Updated: सप्टेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

शिरूर, पाटोदा आणि आष्टी तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी; ३२ जण पुरात अडकले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नद्या तुडुंब, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

आष्टी/शिरूर/पाटोदा : आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे, नाले व नद्यांना मोठा पूर आला आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असून आणखी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा, अनावश्यकपणे नदीकाठावर जाणे टाळावे, असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले आहे.

शिरूर तालुक्यातील वडळी गावातून जाणाऱ्या नदीला आलेल्या पुरामुळे जेधे आणि चव्हाण कुटुंबातील ३२ जण अडकले असून स्थानिक तरुण चप्पूच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिरूर कासार तालुक्यात मोरजळवाडी येथे अडकलेल्या नागरिकांना ग्रामस्थांनी बचाव करून सुरक्षित बाहेर काढले. सवसवाडी रोडवर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. शिरूर शहरातून जाणाऱ्या सिंदफना नदीची पाणीपातळी वाढून वेशीपर्यंत पाणी पोहोचले आहे. यामुळे शहर व परिसरात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी नदीपात्र ओलांडण्याचा किंवा पाण्यातून रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूरगड, तुळजापूर आदी शक्तीपीठांकडे पायी ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना देखील प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असल्याने प्रवास धोकादायक ठरू शकतो. भाविकांनी तात्पुरता प्रवास थांबवून सुरक्षित स्थळी मुक्काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पाटोदा शहरातून वाहणाऱ्या मांजरा नदीलाही मोठा पूर आला आहे. पाटोदा शहरासह महासांगवी, नफरवाडी, पारगाव घुमरा, अनपडवाडी, डिघोळ, जातेगाव आदी गावांमधील नदीलगतच्या शेतांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. शेतकरी व रहिवाशांनी आपले जनावरे त्वरित सुरक्षित स्थळी हलवावीत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Categories

Recent Posts