Breaking

परळी येथील बहुचर्चित खून प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Updated: मार्च 25, 2026

By Vivek Sindhu

परळी येथील बहुचर्चित खून प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ॲड. एम. बी. चव्हाण यांचा युक्तीवाद ठरला प्रभावी

अंबाजोगाई: परळी येथील सावतमाळी नगर भागात २०१४ मध्ये झालेल्या सुनील रोडे खून प्रकरणातील सर्व चारही आरोपींची अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात बचाव पक्षाचे वकील ॲड. एम. बी. चव्हाण यांनी केलेला प्रभावी युक्तीवाद आणि साक्षीदारांची घेतलेली उलटतपासणी न्यायालयाने ग्राह्य धरली. तब्बल १२ वर्षांनंतर लागलेल्या या निकालाची कायदेशीर वर्तुळात चर्चा होत आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीनुसार, २१ ऑक्टोबर २०१४ रोजी सुनील रोडे यांचा खून झाल्याची फिर्याद त्यांची आई कमलबाई रोडे यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी बाळाजी करपुडे, गणेश लोखंडे, भागवत लोखंडे आणि विवेक लोखंडे यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३४ आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, ॲड. एम. बी. चव्हाण यांनी साक्षीदारांच्या जबानीतील विसंगती आणि ठोस पुराव्यांचा अभाव न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, फिर्यादी पक्षाला आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयश आल्याचे स्पष्ट केले. २४ मार्च २०२६ रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने सर्व आरोपींना सर्व आरोपांतून मुक्त करण्याचा आदेश दिला. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. एम. बी. चव्हाण यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. एस. डी. चौधरी यांनी सहकार्य केले.


Categories

Recent Posts