Breaking
Updated: मार्च 24, 2026
पोलिसांच्या तावडीतून आरोपीला पळवले; फौजदाराची सोन्याची साखळीही लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: अपहरण प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस पथकावर बीडमधील मारफळा तांडा येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात जमावाने चक्क पोलीस उपनिरीक्षकाच्या गळ्यातील १२ ग्रॅमची सोन्याची साखळी हिसकावून नेली असून, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीसह पीडित व्यक्तीलाही पळवून नेले आहे. या धक्कादायक घटनेमुळे गेवराई तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे हे आपल्या पथकासह एका अपहरण प्रकरणातील आरोपी लहू अर्जुन जाधव याचा शोध घेत मारफळा तांडा (ता. गेवराई) येथे पोहोचले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आरोपी लहू जाधव आणि पीडित मच्छिंद्र चाफा राठोड यांना ताब्यात घेतले. मात्र, यावेळी तेथे जमलेल्या १० ते १२ जणांच्या जमावाने पोलिसांशी अरेरावी करत आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
पोलीस आपल्या खासगी वाहनाने आरोपीला घेऊन जात असताना, एका दुचाकीवर आलेल्या एका पुरुषाने आणि दोन महिलांनी गाडीसमोर आपली दुचाकी आडवी लावली. इतकेच नाही तर पोलिसांना थांबवण्यासाठी त्यांनी चक्क लहान मुलांना गाडीसमोर फेकण्याचा प्रयत्न केला. गाडी थांबताच जमावाने पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी संजय अर्जुन जाधव याने पोलीस उपनिरीक्षक नरोडे यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी बळजबरीने हिसकावून घेतली. याच गडबडीचा फायदा घेत जमावाने पोलिसांच्या तावडीतून आरोपी आणि पीडित व्यक्तीला पळवून नेले.
या प्रकरणी भगवान नरोडे यांच्या फिर्यादीवरून लहू अर्जुन जाधव, संजय अर्जुन जाधव आणि इतर १० जणांविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शासकीय कामात अडथळा, जबरी चोरी आणि धमकावण्यासारख्या गंभीर कलमांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन कोरडे करत आहेत.