Breaking

धुलीवंदनाच्या उत्साहावर काळाचा घाला; बीडमध्ये कारच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Updated: मार्च 2, 2026

By Vivek Sindhu

बीडमध्ये कारच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: जिल्ह्यात धुलीवंदन साजरा करण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या आनंदावर काळाने झडप घातली असून एका भीषण कार अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. बीड-शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ हा अपघात घडला असून यामध्ये कृष्णा मुळे या युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. सण साजरा करण्याच्या उत्साहात ही दुर्घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा मुळे आणि त्याचे मित्र धुलीवंदन सण साजरा करण्यासाठी कारने एका वॉटर पार्कला जात होते. मात्र प्रवासादरम्यान बीड-शिरूर मार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली आणि थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने कार विहिरीत कोसळली नाही अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. या अपघातात कृष्णाचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक मित्र गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त कारच्या पाठीमागे त्यांच्याच इतर मित्रांची दुसरी कार येत होती. त्यामुळे अपघातानंतर तातडीने मदतीसाठी धाव घेत मित्रांनी जखमींना बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून या घटनेमुळे होळीच्या सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. राज्यभरात धुलीवंदनाचा उत्साह असताना बीडमधील या दुर्घटनेने शोककळा पसरली असून सण साजरा करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Categories

Recent Posts