Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

माजलगाव येथील मच्छी मार्केटमध्ये भरधाव ट्रॅक्टर घुसला

Updated: फेब्रुवारी 4, 2026

By Vivek Sindhu

माजलगाव येथील मच्छी मार्केटमध्ये भरधाव ट्रॅक्टर घुसला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव : माजलगाव शहरातील केसापुरी कॅम्प परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. याच ठिकाणी रस्त्यालगत अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या मच्छी मार्केटमध्ये भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर घुसल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र काही वेळासाठी परिसरात एकच गोंधळ उडाला.

राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असताना, रस्त्याच्या कडेला तसेच काही ठिकाणी थेट रस्त्यावरच मच्छी विक्री केली जात असल्याने अपघाताचा धोका कायम आहे. या भागातून अवजड वाहने, ट्रक, ट्रॅक्टर, बस तसेच दुचाकी मोठ्या संख्येने जात असतात. अचानकपणे रस्त्यावर गर्दी झाल्याने वाहनचालकांचा तोल जात असून गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. “याआधीही अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे, मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नाही,” असे नागरिकांनी सांगितले. रस्त्यावर बसणाऱ्या मच्छी विक्रेत्यांना तात्काळ हटवून सुरक्षित व नियोजित ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

यासोबतच, या परिसरात नियमित पोलिस बंदोबस्त ठेवून वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी करावी, तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा वाहनचालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts