Breaking

अंबाजोगाई तालुक्यातील प्रेमी युगुलाची लातुरात एकत्र आत्महत्या

Updated: ऑक्टोबर 19, 2025

By Vivek Sindhu

2111654

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रेमाला कुटुंबियांचा होता विरोध; मृतात नर्स तरुणी आणि अपंग तरुणाचा समावेश

अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील पेठ गावच्या शिवारात एका नर्स तरुणीने आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एकत्र आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये नितीन दराडे आणि राणी दराडे (दोघेही रा. दरडवाडी, ता. अंबाजोगाई) अशी नावे आहेत. या घटनेमुळे दरडवाडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन दराडे हा शारीरिकदृष्ट्या अपंग असून गेल्या काही वर्षांपासून अहमदपूर येथे राहून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. तर राणी दराडे ही व्यावसायिक नर्स असून लातूर येथील खासगी रुग्णालयात कार्यरत होती. दोघेही नातेवाईक असल्याने त्यांची ओळख प्रेमात रुपांतरित झाली. मात्र, घरच्यांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला. या विरोधामुळे मानसिक ताण आलेल्या दोघांनी अखेर एकत्र आत्महत्येचा निर्णय घेतला.

पेठ गावच्या शिवारातील एका पत्र्याच्या खोलीत दोघांचे मृतदेह आढळले. नितीनने गळफास घेतल्याचे आणि त्याच खोलीत राणीनेही आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. स्थानिकांनी ही घटना पाहून पोलिसांना माहिती दिली. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

या घटनेमुळे दरडवाडीसह अंबाजोगाई तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दोघांच्या शिक्षण, स्वावलंबन आणि मेहनती स्वभावामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपंगत्वावर मात करून नितीनने स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्वतःचं करिअर घडवण्याचा प्रयत्न केला होता, तर राणीने वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. परंतु कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने परिसर हादरला आहे.


Categories

Recent Posts