Breaking
Updated: जानेवारी 13, 2026
केज पोलिसांची साताऱ्यात मोठी कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: वैद्यकीय शिक्षणासाठी ‘एमडी’ला व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका वैद्यकीय अधिकाऱ्याची ८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला केज पोलिसांनी कराड येथून अत्यंत शिताफीने अटक केली आहे. सौरभ सुहास कुलकर्णी (रा. नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अविनाश रामचंद्र तोंडे (वय २७, रा. सोनीमोहा, ता. धारूर) यांनी धारूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी अविनाश तोंडे हे बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना फेसबुकच्या माध्यमातून त्यांची ओळख सौरभ कुलकर्णी याच्याशी झाली. तोंडे यांना एमडी मेडिसिनसाठी प्रवेश घ्यायचा असल्याने कुलकर्णीने त्यांना वर्ध्याच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये ६५ लाख रुपयांत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी त्याने २० ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ८ लाख रुपये रोख आणि ऑनलाईन स्वरूपात घेतले. मात्र, कोणत्याही यादीत नाव न आल्याने आणि कुलकर्णीने पैसे परत करण्यास नकार दिल्याने तोंडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सहायक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी या गुन्ह्याचा तपास हाती घेतला असता, आरोपी कुलकर्णी हा अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्याने नाशिक, सोलापूर, जालना, नागपूर, पुणे, मुंबईसह गुजरात आणि पंजाब राज्यात अशाच प्रकारे तब्बल १५ ठिकाणी ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे केज पोलिसांच्या पथकाने त्याला सातारा जिल्ह्यातील कराड येथून १३ जानेवारी २०२६ रोजी ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली वेंकटराम, जावेद कराडकर, अमिर ईनामदार आणि मंदे यांच्या पथकाने यशस्वी केली. आरोपीकडून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.