Breaking
Updated: सप्टेंबर 1, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज : तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील दहावीचा विद्यार्थी रस्त्यावरून चालत जात असताना भरधाव मोटरसायकलने दिलेल्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मोटरसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा संजय गालफाडे (वय १६, रा. चिंचोलीमाळी, ता. केज) असे त्या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
कृष्णाचे वडील संजय भिमराव गालफाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कृष्णा हा १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता अभ्यासासाठी चुलत भावाच्या शेतात गेला होता. रात्री साडेआठच्या सुमारास केज–नांदुर रोडवर रघुनाथ गलांडे यांच्या शेताजवळ भरधाव दुचाकीने त्याला मोटरसायकलने (MH44 AD 2843) जोराची धडक दिली. या अपघातात कृष्णा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने केज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, नंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील एसआरटीआर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, एक आठवडा उपचार सुरू असताना २३ ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
सदर फिर्यादीवरून निष्काळजीपणे गाडी चालवून कृष्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून मोटरसायकलस्वार शिवाजी बन्सी जायभाये (रा. सातेफळ, ता. केज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास केज पोलीस करत आहेत.