Breaking
Updated: मे 9, 2026
धारूर पोलिसांची धडक कारवाई : ३१ लाख ६२ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel
किल्ले धारूर : महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीवर धारूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३१ लाख ६२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, केज विभाग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ८ मे २०२६ रोजी आडस ते धारूर रोडदरम्यान नाकाबंदी करण्यात आली होती. धारूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने रोडकर डुबे प्लॉट परिसरात सापळा रचला होता.
नाकाबंदी दरम्यान पांढऱ्या रंगाची इनोव्हा क्रिस्टा (एमएच १४ जीयू ०६९९) संशयितरित्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनातून गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा तीव्र वास येत होता. त्यानंतर पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला आढळून आला.
तपासणीदरम्यान वाहनातील व्यक्तींनी आपली नावे सय्यद कलीम निजाम सय्यद (वय ४२, रा. फुलेनगर, माजलगाव) व सिद्दीकी अब्दुल अहद जुबेर अहमद (वय १९, रा. अशोकनगर, माजलगाव) अशी सांगितली. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये वी-१ बिग सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, विविध प्रकारचा गुटखा, रजनीगंधा पान मसाला, इनोव्हा क्रिस्टा वाहन तसेच दोन मोबाईल फोन यांचा समावेश आहे. यामध्ये केवळ वाहनाची किंमतच २४ लाख रुपये असून इतर तंबाखूजन्य पदार्थांची किंमत लाखोंमध्ये आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३१ लाख ६२ हजार ८० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८६/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलिस अधीक्षक सचिन पांडकर व अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि देविदास वाघमोडे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सपोनि देविदास वाघमोडे व सपोनि रमाकांत भुसारी करीत आहेत