Breaking
Updated: मे 9, 2026
एनडीकेएसपी अंतर्गत इंदपवाडीत हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक.
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी(प्रतिनिधी): – नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (एनडीकेएसपी) अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान (सीआरटी) प्रात्यक्षिक मोहिमेच्या अनुषंगाने इंदपवाडी येथे बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड व तालुका कृषी अधिकारी डॉ. अर्चना नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी अलनिनोच्या पार्श्वभूमीवर कमी ते मध्यम कालावधीत काढणीस येणाऱ्या जेएस-९३०५, एमएयुएस-७१, एमएसयूएस-१५८, एमएयुएस-६१२ व केडीएस-९९२ या सोयाबीन वाणांची निवड करण्याचा सल्ला दिला. तसेच हुमणी अळी व्यवस्थापनासाठी एरंड सापळे, प्रकाश सापळे उभारण्याचे आणि सोयाबीनमधील कीड नियंत्रणासाठी एरंडी व झेंडू ही सापळा पिके घेण्याचे मार्गदर्शन केले. येळकर यांनी सोयाबीन बीजप्रक्रियेसाठी शिफारशीतील बुरशीनाशक कीटकनाशक आणि जिवाणू संघ यांची बीज प्रक्रिया हॅन्ड ग्लोज वापरून करून दाखवले. सहाय्यक कृषी अधिकारी यमुना हाडबे यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दाखवून याचे महत्त्व स्पष्ट केले. समूह सहाय्यक हनुमंत चोले यांनी एनडीकेएसपी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी येळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी रुंद वरंबा सरी किंवा बेड तयार करणे, बियाणे उगवण क्षमता तपासणी करून कीडनाशक व जिवाणू संघ यांची बीजप्रक्रिया करून हवामान अनुकूल तंत्रज्ञान अवलंबण्याची सामूहिक शपथ दिली. याप्रसंगी डॉ. गोरखनाथ मुंडे, केशव मुंडे, महादेव मुंडे, अंगद मुंडे, गोविंद मुंडे, वाल्मिक मुंडे, बाळासाहेब मुंडे, बिभीषण मुंडे, रामचंद्र मुंडे, लहूदास मुंडे, माऊली मुंडे, विष्णू मुंडे आदी शेतकरी उपस्थित होते.
अशी करा सोयाबीन बीजप्रक्रिया
सोयाबीनच्या एक किलो बियाण्यासाठी अझॉक्सिस्ट्रोबिन २.५ टक्के अधिक थायोफिनेट मिथाईल ११.२५ टक्के अधिक थायामेथोक्सम २५ टक्के एफएस या पूर्वमिश्रित संयुक्त औषधाची १० मिली प्रक्रिया करावी. हे उपलब्ध नसल्यास कार्बोक्सीन ३७.५ टक्के अधिक थायरम ३७.५ टक्के डीएस (३ ग्रॅम) किंवा पेनफ्लुफेन १३.२८ टक्के अधिक ट्रायफ्लोक्सीस्ट्रोबिन १३.२८ टक्के (१ मिली) किंवा थायोफिनेट मिथाईल अधिक पायराक्लोस्ट्रोबिन (३ मिली) यापैकी एक वापरावे. त्यानंतर थायामेथोक्साम ३० टक्के एफएस (६ मिली) प्रक्रिया करावी. शेवटी ब्रेडीरायझोबियम जापोनिकम २० मिली व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २० मिली लावावेत. रासायनिक प्रक्रिया पेरणीपूर्वी ४ ते ५ दिवस आधी करता येते; मात्र जिवाणू संवर्धक प्रक्रिया पेरणीच्या अर्धा तास आधी करावी.
– शिवप्रसाद येळकर तंत्रज्ञान समन्वयक, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, अंबाजोगाई