Breaking
Updated: एप्रिल 13, 2026
महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे थोर समाजसुधारक, शिक्षणप्रणेते आणि स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती उत्साहात आणि सामाजिक जाणिवेने साजरी करण्यात आली.
शहरातील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित बी.फार्मसी महाविद्यालय, अंबाजोगाई येथे मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी आणि सौ.डिंपल संकेत मोदी, प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, उपप्राचार्य प्रा.वसंतराव चव्हाण, प्राचार्य डी.एच.थोरात, प्रा.एस.ए.बिराजदार आणि प्रा.राघवेंद्र राजमान्य यांच्या मार्गदर्शनानुसार थोर समाजसुधारक, शिक्षणप्रणेते आणि स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जाणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यानंतर विभागप्रमुख प्रा.मंदार चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत करत महात्मा फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. त्यांनी स्त्री शिक्षण, समाजाच्या उन्नतीसाठी केलेले कार्य आणि सत्यशोधक समाजाच्या स्थापनेद्वारे समाजपरिवर्तनाचा घेतलेला ध्यास यावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संतोष तरके यांनी कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करत महात्मा फुले यांच्या कार्याची महती सांगितली. त्यांनी सांगितले की, शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, ही शिकवण महात्मा फुले यांनी दिली असून आजच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून ज्ञानसाधना करावी. त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी आणि समानतेच्या मूल्यांची जाणीव करून दिली. महात्मा फुले यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर भाषणे सादर केली तसेच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आधुनिक भारतातील समाज सुधारक, स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि समता व बंधुता यांसारख्या विषयांवर आपले विचार मांडले. यासोबतच सामाजिक विषयांवर चर्चासत्र आणि विशेष वाचन व प्रेरणादायी विचारांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.मंदार चौधरी यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. प्राचार्य डॉ.तरके यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक करत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते आणि आदर्श व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडतो असे सांगितले.