Breaking

जागेच्या वादातून शेजाऱ्यावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

जागेच्या वादातून शेजाऱ्यावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार: घरासमोरील जागेच्या कारणावरून झालेल्या वादात शेजाऱ्याने एका ३५ वर्षीय तरुणाच्या डोक्यात लोखंडी गज मारून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे. आठ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

बाळभुज श्रीधर पवार (वय ३५, रा. रायमोह, ता. शिरूर कासार) यांच्या फिर्यादीनुसार, शुभम राम काशिद आणि सौरभ राम काशिद (दोघे रा. रायमोह, ता. शिरूर कासार) हे त्यांचे शेजारी आहेत. आठ एप्रिल रोजी सायंकाळी घरासमोरील जागेवरून त्यांचा वाद सुरू झाला. सदर जागा आपली असतानाही आरोपींनी ही २० फूट जागा आमची आहे, असा दावा करत बाळभुज आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद वाढत गेल्याने आरोपी शुभम काशिद याने रागाच्या भरात हातात लोखंडी गज घेऊन बाळभुज पवार यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात बाळभुज यांचे डोके फुटून ते गंभीर जखमी झाले. तू जागा कशी देत नाहीस तेच बघतो, असे म्हणत दोन्ही आरोपींनी बाळभुज यांना लाथाबुक्क्यांनी आणि चापटीने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीवरून शिरूर कासार पोलीस ठाण्यात शुभम काशिद आणि सौरभ काशिद या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे हे करत आहेत.


Categories

Recent Posts