केज – कृषी केंद्रावर काम करीत असलेला ३२ वर्षीय इसम हा त्याच्या मित्राच्या सोबत चाकरवाडी जात असल्याचे सांगून गेला. मात्र तो घरी परत न आल्याने तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसात दिल्यावरून मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
नांदुरघाट (ता. केज) येथील विलास मदन पाटोळे (वय ३२) हे नांदूर फाटा येथील शिवप्रसाद कृषी सेवा केंद्रावर काम करतात. १२ जून रोजी विलास पाटोळे हे कृषी सेवा केंद्रावर काम करून सायंकाळी घरी आले. जेवण करून त्यांनी पत्नीकडे फायनान्सच्या कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे दिले. त्यानंतर मित्रासोबत चाकरवाडी येथे सुरू असलेल्या शिवपुराण कथेच्या कार्यक्रमाला जात आहे, असे सांगून निघून गेले. त्यानंतर रात्री ते घरी परत आले नाहीत. त्यांचा मोबाईल ही बंद आढळून आल्याने त्यांची पत्नी ज्याती विलास पाटोळे यांनी पती विलास पाटोळे हे बेपत्ता असल्याची तक्रार केज पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून मिसिंगची नोंद घेण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.