Breaking
Updated: June 14, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Group रस्ता, नाल्याची कामे करण्याची गरज
केज – केज शहरातील आदर्श कॉलनी हा भाग नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ७ मध्ये येतो. या भागातील रस्ता व नाल्यांचा प्रश्न सुटलेला नसून ही कॉलनी मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे. आता पावसाळ्याच्या दिवसात रस्ता व नाली अभावी नागरिकांची अडचण झाली आहे. याची दखल घेऊन नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता व नाल्यांची कामे करण्याची गरज आहे.
केज शहरातून मांजरसुंब्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आदर्श कॉलनी असून हा भाग नगरपंचायतीच्या प्रभाग क्र. ७ मध्ये येतो. या भागातील रस्ता आणि नाल्यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्यात आलेला नसल्याने रस्त्यावर चिखल होत असून त्यातून नागरिकांना वागावे लागत आहे. तर नाली नसल्याने सांडपाणी साठून राहत असून रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे रस्ता कोरडा राहत नसून रस्त्यावर तळे साचत आहे. साठून राहिलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून मच्छर, डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाला असून पावसाचे पाणी रस्त्यावर व खोदलेल्या नालीत साठून राहू लागल्याने या भागात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे या भागात तात्काळ रस्ता व नाल्यांची कामे करण्याची गरज निर्माण झाली. नगरपंचायतीकडून रस्ता व नाल्यांची कामे केली जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याची दखल घेऊन पदाधिकाऱ्यांनी रस्ता व नालीचे काम तात्काळ हाती घेऊन या भागात मूलभूत सुविधा पुरवून जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
—-
नगराध्यक्षांच्या प्रभागात आदर्श कॉलनी
—-
नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सीता बनसोड या प्रभाग क्र. ७ मधून निवडून नगराध्यक्षा झाल्या. याच प्रभागात आदर्श कॉलनी हा भाग येत असून त्यांच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात रस्ता व नालीचा प्रश्न सुटला नसून त्यांना आणखी अडीच वर्षाचा कार्यकाळ वाढवून मिळाला आहे. त्यामुळे रस्ता व नालीचा प्रश्न सोडवतील, अशी अपेक्षा ही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.