Breaking
Updated: मार्च 25, 2026
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. इस्माईल गवळी यांना स्वाराती रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांकडून मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (स्वाराती) गुरुवारी सकाळी एका रिक्षाचालकाची सुरू असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेले वकील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲड. इस्माईल गवळी यांना सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. बुधवारी (दि.२५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अपघात विभागासमोर हा प्रकार घडला असून यात ॲड. गवळी यांच्यासह अन्य काही सामाजिक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. वकील संघटनेसह विविध राजकीय पक्षांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील अपघात विभागासमोर एका रिक्षाचालकाचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला होता. हा वाद विकोपाला जाऊन सुरक्षा रक्षक रिक्षाचालकाला मारहाण करत असताना तिथे उपस्थित असलेले ॲड. इस्माईल गवळी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा रक्षकांनी गवळी यांना त्यांच्या कार्यालयात नेऊन काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गवळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच शहरातील वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
अंबाजोगाई वकील संघाने या घटनेचा निषेध करत संबंधित सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे. तसेच, गुन्हे दाखल झाल्यास या सुरक्षा रक्षकांचे वकीलपत्र एकही वकील घेणार नसल्याचेही अध्यक्ष ॲड. अजित लोमटे यांनी सांगितले. दरम्यान, स्वाराती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. धपाटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित सुरक्षा रक्षकांना १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले असून या प्रकरणाचा चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. अंबाजोगाई शहर पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.