Breaking
Updated: मार्च 24, 2026
संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना धमकीचे फोन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला थांबवण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह नातेवाईकांना वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येत असल्याचा दावा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ माजली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची आज बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना लॅपटॉपमधील अतिरिक्त पुरावे पेन ड्राईव्हच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ देण्याची मागणी केली. पण सदर व्हिडिओ ई-साक्ष या शासकीय अॅपवर अपलोड असल्यामुळे ते देण्यास विरोध दर्शवला. यावेळी आरोपी क्रमांक 3 ते 7 यांच्याकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यासाठी एक अर्ज कोर्टात सादर करण्यात आला. पण तो कोर्टाने फेटाळला.
आज या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराडने आणखी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली. नीलेश घाणेकर असे या वकिलाचे नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगरचे आहेत. या प्रकरणा आता ते वाल्मीक कराडची बाजू मांडतील. यावेळी न्यायालयाने प्रस्तुत प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या सद्यस्थितीविषयी सीआयडीकडे विचारणा केली. त्यावर सीआयडीने त्याचा शोध अद्याप सुरू असल्याचे सांगितले. तसेच त्याची माहिती देणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचेही कोर्टाला सांगितले.
दुसरीकडे, या सुनावणीनंतर पत्रकारांशी बोलातना संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपल्या कुटुंबीयांना हे प्रकरण मिटवण्यासाठी वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन येत असल्याचे सांगितले. मला व व माझ्या नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबरवरून फोन येत आहेत. त्याद्वारे ही केस कशी थांबवता येईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण आम्ही त्यात पडत नाही. आम्ही त्याची पोलिस अधीक्षकांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे. मी या प्रकरणी त्याची भेटही घेणार आहे. ते या प्रकरणी ठोस कारवाई करतील असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींनी जिल्ह्यातील एका (आवादा) कंपनीकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्याला संतोष देशमुख यांनी विरोध केला होता. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संतोष देशमुख यांची हत्या, आवादा कंपनीकडून उकळण्यात येणारी खंडणी व कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे केज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेत. यासंबंधी सीआयडी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने 27 फेब्रुवारी रोजी बीड जिल्हा न्यायालयात 1200 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
पोलिसांनी या प्र्करणी 7 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. कृष्णा आंधळे हा अन्य एक आरोपी गत 14 महिन्यांपासून फरार आहे. या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.