Breaking

गुंगीचे औषध देऊन नराधम चुलत्याने पुतणीवर केला अत्याचार

Updated: मार्च 23, 2026

By Vivek Sindhu

केज तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना

केज: तालुक्यातील एका गावात माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहित पुतणीला गुंगीचे औषध देऊन स्वतःच्या सख्ख्या चुलत चुलत्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा तब्बल पाच महिन्यांनंतर उलगडा झाला असून पीडितेच्या तक्रारीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात नराधम चुलत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणुसकी आणि रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ही घटना १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास घडली. पीडित १९ वर्षीय विवाहित तरुणी ही काही दिवसांपूर्वी माहेरी आपल्या आई-वडिलांकडे आली होती. यावेळी शेत वस्तीवर शेजारीच राहणाऱ्या तिच्या ५० वर्षीय चुलत चुलत्याने तिला पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध पाजले. औषधामुळे पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली.

जीवाच्या भीतीपोटी पीडितेने सुरुवातीला ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. मात्र, त्यानंतर पुन्हा माहेरी आल्यानंतर तिने धिर एकवटून घडलेला सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. या धक्कादायक प्रकारामुळे हादरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठले. शनिवारी सायंकाळी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात ५० वर्षीय आरोपी चुलत्याविरुद्ध गुन्हा र. नं. ६८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एफ) आणि ३५१(२) अन्वये अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सध्या आरोपी फरार असून तो जिल्ह्याबाहेर दडून बसल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत बर्डे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Categories

Recent Posts