Breaking

अंबाजोगाई जिल्हा कारागृहाच्या जागेला संरक्षक भिंत उभारण्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर; आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

Updated: मार्च 4, 2026

By Vivek Sindhu

आ. नमिता मुंदडांच्या पाठपुराव्याला यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील प्रस्तावित जिल्हा कारागृहाच्या ३० एकर शासकीय जमिनीला सुरक्षा कारणास्तव संरक्षक भिंत उभारण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ४ कोटी ५ लक्ष ७९ हजार २५८ रुपयांच्या निधीला अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. अंबाजोगाई येथे जिल्हा कारागृह व्हावे आणि या नियोजित जागेवर भविष्यात कोणतीही अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे. ही प्रशासकीय मान्यता जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२०२६ अंतर्गत देण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत या कामाला मंजुरी देण्यात आली असून यामध्ये कारागृहाच्या सर्वे क्रमांक १/अ/५ मधील ३० एकर परिसराची नाकेबंदी करण्यासाठी मोठी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. अधिक्षक जिल्हा कारागृह यांच्यामार्फत या कामाची अंमलबजावणी केली जाणार असून या कामासाठी ९ जानेवारी २०२६ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती.

बीडच्या एकमेव जिल्हा कारागृहावरील ताण लक्षात घेता आणि पोलीस प्रशासनाच्या सोयीसाठी आमदार नमिता मुंदडा यांनी प्रयत्नपूर्वक अंबाजोगाई येथे जिल्हा कारागृह मंजूर करून घेतले होते. त्यासाठी सर्व्हे क्रमांक १७ येथे ३० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. कारागृहाच्या मोकळ्या जमिनीवर होणारी संभाव्य अतिक्रमणे रोखण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षेसाठी ही भिंत अत्यंत आवश्यक होती. मात्र आता या निधीमुळे ही संपूर्ण जागा संरक्षित होणार असून या निर्णयाचे स्वागत होत आहे. निधीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.


Categories

Recent Posts