Breaking
Updated: फेब्रुवारी 3, 2026
तक्रारदारांना आता केज पोलिस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelतक्रारदारांना आता केज पोलिस ठाण्यात जाण्याची आवश्यकता भासणार नाही
केज :- केज पोलीस ठाण्यापासून नांदूरघाट हे ३५ किमी अंतरावर आहे. तर नांदूरघाट येथे पोलीस चौकी असली तक्रारदारांना तक्रार नोंदविण्यासाठी केजला यावे लागत होते. त्यामुळे येण्या जाण्याचा खर्च आणि वेळ वाया जात होता. शेवटी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी पुढाकार या पोलीस चौकीत तक्रार नोंदविण्याची व्यवस्था केली असून पोलीस कर्मचारी तक्रार घेऊन ठाण्यात गुन्हा नोंद करणार आहेत. त्यामुळे तक्रारदारांचा वेळ आणि खर्चाची बचत होण्यास मदत मिळणार आहे.
केज पोलीस ठाण्यांतर्गत नांदूरघाट येथे पोलीस चौकी असून ठाण्यापासून ही पोलीस चौकी ३५ किमी अंतरावर आहे. या चौकीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशोक सोनवणे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब सानप, जमादार राजू वंजारे, जमादार उमेश आघाव, पोलीस अंमलदार रशीद शेख, पोलीस नाईक शमीनपाशा शेख यांची नियुक्ती आहे. चौकीच्या हद्दीत नांदूरघाट, शिरूरघाट, राजेगाव, वाघेबाभूळगाव, दहीफळ (वडमाऊली), देवगाव, लिंबाचीवाडी, नाव्होली, बानेगाव, सारणी (सां.), एकुरका, मुंडेवाडी, पिराचीवाडी या मोठ्या गावांसह ३२ गावांचा समावेश आहे.
या परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यासंदर्भात तक्रार देण्यासाठी तक्रारकर्त्याना ३५ किमी अंतरावरून केज ठाण्यात यावे लागत होते. त्यासाठी अनेक गावांतून वाहनांची सोय नसल्याने तक्रारकर्त्यांना भाड्याने वाहन करून यावे लागत होते. त्यामुळे वाहनांचा येण्या – जाण्याचा खर्च आणि त्याचबरोबर वेळेचा अपव्यय होत होता. शिवाय जखमींना उपचारासाठी केजच्या रुग्णालयातून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रेफर केले जाते. त्यामुळे जवळच्या नातेवाईकांसाठी गैरसोयीचे होत होते.
तक्रारदार यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी चौकी अंतर्गत असलेल्या गावांत घडणाऱ्या गुन्ह्यांची तक्रार चौकीत नमूद करून घ्यायची व्यवस्था केली आहे. त्यानुसार पोलीस चौकीच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी स्वतः ठाण्यात येऊन तक्रार दाराच्या फिर्यादी नुसार गुन्हा नोंदवून त्याचा एफआयआर फिर्यादी पर्यंत पोहच करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे फिर्यादी तक्रारदारांना आता ठाण्या पर्यंत येण्याची गरज भासणार नाही. त्यांना चौकीत जाऊन तक्रार नोंदविता येणार आहे. त्यातून तक्रारदाराच्या वेळेसह आर्थिक बचत होण्यास मदत मिळणार आहे.
दोन अधिकारी निवासी, जीप ही उपलब्ध
फौजदार अशोक सोनवणे व सहाय्यक फौजदार बाबासाहेब सानप हे नांदूरघाटला निवासी आहेत. उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाण्यांतर्गत इतर कामे दिली जात आहेत. मात्र या दोन्ही निवासी अधिकाऱ्यांना चौकीच्या कामाची पूर्णवेळ जबाबदारी सोपविली आहे. शिवाय चौकीसाठी स्वतंत्र सरकारी जीपची व्यवस्था केली आहे.
” नांदुरघाट येथील पोलीस चौकीचे बांधकाम निजामकालीन आहे. याची डागडुजी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. मात निधी प्राप्त झाल्यास अत्याधुनिक अशी ही चौकी करण्याचा मानस आहे. यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल.”
-स्वप्नील उनवणे, पोलिस निरीक्षक, केज