Breaking
Updated: जानेवारी 15, 2026
एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील बर्दापूर येथे मुलांच्या भांडणातून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर एका भीषण हिंसाचारात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या अश्विनी शहाजी मोरे या २३ वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्या मंडळींनी क्रूर वागणूक दिली. ही घटना १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या दिवशी अश्विनी घरात कपडे धुवत असताना तिचा मुलगा शिवांश आणि दीराचा मुलगा सुरज यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. यावेळी सासरा मोहन साधू मोरे याने शिवांशला मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्विनीने मुलाला का मारता असे विचारले असता, पती शहाजी मोहन मोरे याने तिला अर्वाच्च भाषेत बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी सासू विजयमाला मोहन मोरे हिने गरम केलेला लोखंडी गजाचा तुकडा आणून दिला. पतीने या तापलेल्या गजाने अश्विनीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर आणि हातावर पाच ठिकाणी चटके दिले. ‘हिली उभी पेटवून द्या’ असे चिथावणीखोर वक्तव्य सासऱ्याने केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जखमी अवस्थेत अश्विनीला उपचारासाठी जाऊ दिले जात नव्हते, अखेर तिने वडिलांना फोन करून बोलावून घेतले. अंबाजोगाई येथे उपचार घेतल्यानंतर तिने बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८, ११५(२), ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार समाधान भाजीभाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.