Breaking

केतसारणी येथे कापूस प्रक्षेत्र दिन व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

Updated: जानेवारी 5, 2026

By Vivek Sindhu

केतसारणी येथे कापूस प्रक्षेत्र दिन व सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (बातमीदार) केज तालुक्यातील मौजे केकतसारणी येथे शनिवार, दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी कृषि विज्ञान केंद्र, डिघोळअंबा (अंबाजोगाई) यांच्या वतीने कापूस शेती दिन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष कापूस प्रकल्पांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केकतसारणी गावच्या सरपंच अनिता पंडित सावंत होत्या. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई येथील शास्त्रज्ञ नरेंद्र जोशी (उद्यानविद्या), कृष्णा कर्डीले (कृषिविद्या), सुहास पंके (कृषि विस्तार) यांच्यासह बळीराम वीर (राशी सिड्स), प्रगतशील शेतकरी, महिला शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात सघन लागवड पद्धतीने (HDPS) कापूस लागवडी बाबत माहिती देण्यात आली. मार्गदर्शन करताना शास्त्रज्ञ कृष्णा कर्डीले यांनी कापूस पिकातील गळ फांदी छाटणीचे महत्व, सघन लागवड पद्धतीचे फायदे, योग्य मशागत, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादनात होणारी वाढ याविषयी सविस्तर माहिती दिली. शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज असून धाग्याच्या गुणवत्तेनुसार कापसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी सुधारित तंत्रज्ञान अवलंबवावे. तसेच ‘एक गाव – एक वाण – एक तंत्रज्ञान’ ही संकल्पना स्वीकारल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

सुहास पंके यांनी केंद्र सरकारच्या ‘जी राम जी’ कायद्यासह विविध शासकीय योजनांची माहिती दिली. याचबरोबर सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य अधोरेखित करत, महिलांनी शिक्षण, शेती व उद्योजकतेत पुढे येण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा जो विचार मांडला, तो आजच्या आधुनिक शेतीसाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचा शेतीतील सहभाग वाढल्यास कुटुंबाची व गावाची आर्थिक प्रगती वेगाने साध्य होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

नरेंद्र जोशी यांनी फळबाग व्यवस्थापन, अद्रक पिकातील मर रोग व त्यावरील उपाययोजना, अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. बळीराम वीर यांनी कापूस पिकासाठी प्लांटरद्वारे पेरणी, यंत्राद्वारे वेचणी, योग्य वाणांची निवड तसेच कोरडवाहू भागात प्लांटरद्वारे लागवडीचे महत्त्व विषद केले.

कार्यक्रमात शेतकरी व महिला शेतकऱ्यांनी सघन लागवड पद्धतीने मिळालेल्या उत्पादनवाढीचे अनुभव सांगितले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांनी शिक्षण, शेती व समाजपरिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी, असा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास पंके यांनी केले, तर अध्यक्षीय समारोप अनिता सावंत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रविंद्र अंबाड, ऋषिकेश काळे, सागर काळे तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रत्यक्ष उपयोगी व मार्गदर्शक माहिती मिळाल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


Categories

Recent Posts