Breaking

बीड शहर पोलिसांची ‘कनेक्टिव्हिटी’; चोरीला गेलेले १८ मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन

Updated: डिसेंबर 17, 2025

By Vivek Sindhu

चोरीला गेलेले १८ मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड शहरातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. महागडे मोबाईल हरवल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर ते परत मिळण्याची आशा सोडून दिलेल्या नागरिकांना बीड शहर पोलिसांनी सुखद धक्का दिला आहे. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे विशेष शोधमोहीम राबवून तब्बल १८ मोबाईल फोन शोधून काढले आणि ते आज मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. अनेकदा मोबाईल चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास नागरिक पोलीस ठाण्यात तक्रार देतात, पण तपास लागणे कठीण असते. मात्र, बीड शहर पोलिसांनी या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास केला. पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली.

या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, पोलीस अंमलदार सुषेण उगले आणि सय्यद शहनशहा यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. पथकाने सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून आणि सखोल तांत्रिक विश्लेषण करून या १८ मोबाईलचा माग काढला. आज पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या हस्ते संबंधित फिर्यादींना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. आपला हरवलेला फोन पुन्हा सुस्थितीत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या कामगिरीमुळे पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


Related Posts :

Categories

Recent Posts