Breaking
Updated: डिसेंबर 11, 2025
महावितरणच्या उपभियंत्यांच्या आश्वासनानंतर क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यातील लाडेगाव, दीपेवडगाव, लाडेवडगाव, मुलेगाव येथील शेतकऱ्यांना उच्च दाबाने दररोज आठ तास वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली होळ येथील ३३ केव्ही विद्युत उपकेंद्रासमोर गुरुवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी धारूरचे उपकार्यकारी अभियंता गोकुळ मोरे, कनिष्ठ अभियंता अभिजित पाटिल यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
केज तालुक्यातील लाडेगाव, दीपेवडगाव, लाडेवडगाव, मुलेगाव येथील शेतकऱ्यांना कृषि पंपासाठी तब्बल ३० व काही ठिकाणी ३६ तासानंतर कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने विजेअभावी रब्बी हंगामातील पिकांना पाणी मिळत नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ लागल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यामुळे दररोज उच्च दाबाने ८ तास वीज पुरवठा करावा, होळ ३३/११ के.व्ही. विद्युत उपकेंद्रांतर्गत लाडेगाव, दिपेवडगाव, लाडेवडगाव, मुलेगाव येथील गावठाण व कृषी फीडर स्वतंत्र करून वीज पुरवठा करण्यात यावा, होळ उपकेंद्रास ५ एमव्हिए + १० एमव्हिए क्षमतेचे रोहित्र तात्काळ बसविण्यात यावे या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली होळ येथील विद्युत उपकेंद्रासमोर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून दुपारी २ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. तर भाजपाचे नेताजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) संभाजी लोमटे यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. यावेळी धारूरचे उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गोकुळ मोरे, कनिष्ठ अभियंता अभिजित पाटील यांनी आंदोलकांच्या मागण्या मान्य करून पुढील तीन दिवसात वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
आंदोलनात बालाजी गुळभीले, ऍड. राजेश शिंदे, योगेश्वर अंबाड, दीपक अंबाड, हरिभाऊ आघाव, प्रमोद पांचाळ, राजाभाऊ सोमवंशी, संतोष शिंदे, सुशांत अंबाड, अंगद अंबाड यांच्यासह लाडेगाव, दिपेवडगाव, लाडेवडगाव, मुलेगाव, होळ येथील शेतकरी सहभागी झाले होते. युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.