Breaking

ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाईच्या कवि संमेलनातून व्यवस्थेवर प्रहार

Updated: नोव्हेंबर 4, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईच्या कवि संमेलनातून व्यवस्थेवर प्रहार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सोनियाचा पिंपळ झडू लागला, ज्ञानदेव समाधीत रडू लागला – दिनकर जोशी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- येथील ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवि संमेलनातून व्यवस्थेवर प्रहार करण्यात आला. सहभागी सर्वच कविंनी आपल्या काव्यरचनांमधून उपस्थित रसिक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सोनियाचा पिंपळ या सुप्रसिद्ध कवितेतून प्रख्यात कवी दिनकर जोशी यांनी सद्यस्थितीवर परखड भाष्य केले.

शहरातील ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाईचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर, सचिव शिवाजी शिंदे आणि समस्त कार्यकारिणी यांच्या पुढाकाराने कुणबी विकास मंच, मुकुंदराज रोड, अंबाजोगाई यांच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी कवि संमेलन आयोजित करण्यात आले होते. या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक व कवि विश्वंभर वराट (कवी संमेलनाध्यक्ष) हे होते. या कवि संमेलनात प्रख्यात कवी दिनकर जोशी, भागवत मसने, सतिश घाडगे, राजेश रेवले, राजेंद्र रापतवार, पवन‌ खरात, अतुल बलाढ्ये हे कवि सहभागी झाले होते. कवि संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन गोरख शेंद्रे यांनी केले. यावेळी वराट गुरूजी यांनी विश्व शांतीसाठी बुद्ध हवा अशी साद घातली. ते आपल्या कवितेत म्हणतात की,
माणूस तितुका एक म्हणोनी,
नको युद्ध अन् नसावी हानी
या विश्वाच्या शांतीसाठी बुद्ध एकदा हवा…
कवि – विश्वंभर वराट (कवी संमेलनाध्यक्ष)
तर प्रख्यात कवी दिनकर जोशी यांनी आपल्या सुप्रसिद्ध सोनियाचा पिंपळ या गेय कवितेतून व्यवस्थेला जाब विचारला. चिंतन मांडले. कविवर्य जोशी आपल्या कवितेत म्हणतात की,
सोनियाचा पिंपळ झडू लागला.
ज्ञानदेव समाधीत रडू लागला.
कवि – दिनकर जोशी
या कविसंमेलनात प्रा.डॉ.सतीश घाडगे यांनी कुणब्याचे जीवन, त्याचे प्रश्न आणि त्याच्या पुढच्या पिढीने कष्टाची जाणीव ठेवून आयुष्याची वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रा.डॉ.घाडगे आपल्या कवितेत म्हणतात की,
संसारात रमताना
माय-बापांची जाण ठेवत जा
चिल्या पिल्यांना भरवताना
माय-बापांना घास ठेवत जा
कवि – प्रा.डॉ.सतीश घाडगे
प्रख्यात ग्रामीण कवि राजेश रेवले यांनी नेहमीप्रमाणेच गावगाडा, माणसं, निसर्ग यांना आपल्या कवितेतून पुढे आणत एक बेहतरीन रचना सादर केली. रेवले आपल्या कवितेत म्हणतात की,
जुनी जाणती अशी माणसे
गावगाड्याची हरिकथा
तुम्हा सांगतो हीच माणसे
खरी गड्यांनो ग्रामगीता !
कवि – राजेश रेवले
अंबाजोगाईकरांना विडंबन काव्यातून मनमुराद हसवत, सद्यस्थितीवर परखड भाष्य करणारे हसमुख वात्रटिकाकार भागवत मसने यांनी डिजिटल मिडिया आणि त्याच्या राजकीय गंमतीजमत याबाबत उपस्थितांचे लक्ष वेधून घेताना ते म्हणतात की,
नसतेच कांही कर्तव्य
नुसतीच कीर्ती गाजावी.
आणि उंची हरवलेल्या नेत्याची उंची
आता डिजिटलवरच मोजावी.
कवि – भागवत मसने
अतहर हुसैन या कविंनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत भारतीय भुमीचे महत्त्व विशद केले. भारतीय लहान मुले ही सैनिकांपेक्षा काही कमी नाहीत असेच शायर हुसैन यांना म्हणायचे आहे की,
डर नहीं हैं हमको कोई चीन या पाकिस्तान का
बच्चा-बच्चा है सिपाही मेरे हिंदुस्थान का
कवि – अतहर हुसैन
ज्येष्ठ कवी राजेंद्र रापतवार यांनी ही आपल्या कवितेतून नातेसंबंधातील ओलावा टिपला आहे.‌ नेहमीप्रमाणेच त्यांनी अतिशय सुंदर शब्द रचनेतून उपस्थितांच्या मनाला साद घातली आहे. रापतवार आपल्या कवितेत म्हणतात की,
वाहत्या पाण्याला साक्ष,
डोळ्यांतल्या आसवांचा काठ.
दुथडी भरून पावसाचे पाणी
मन ओलेचिंब, वेदनेचा परिपाठ.
कवि – राजेंद्र रापतवार
पवन खरात या तरूण कविने अतिशय सुंदर शब्द रचनेतून मनाला कसे सांभाळावे, स्वतःसाठी जगावे याची लालसा माणसाला कशी असते याचे नेमके चित्रण कवितेतून रेखाटले आहे. कवि खरात आपल्या कवितेत म्हणतात की,
मने सांभाळली सारी, स्वतःला भेटलो नाही.
स्वतःसाठी जगावे ही मलापण लालसा आहे.
कवि – पवन खरात
या कवि संमेलनात जीवनाचे दाहक अनुभव विशद करताना तरूण कवि अतुल बलाढ्ये यांनी जिंदगी पोळली असा उल्लेख केला आहे. माकड आणि माणूस यांच्या वर्तणुकीचा संदर्भ दिला आहे. कवि बलाढ्ये आपल्या कवितेत म्हणतात की,
माकडासारखी वागली वाकडे
माणसासारखी भेटली माकडे
विस्तवाच्यापरी पोळली जिंदगी
देह विझल्यावरी पेटली लाकडे
कवि – अतुल बलाढ्ये
ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवि संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन करताना सूत्रसंचालक गोरख शेंद्रे यांनी ही अतिशय मोजक्या व नेमक्या शब्दांत, तिरकस अंदाजात सुप्रसिद्ध कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या शतदा प्रेम करावे या कवितेचे उत्तम विडंबन करून उपस्थितांना मनमुराद हसवले. कवि शेंद्रे आपल्या कवितेत म्हणतात की,
या डोळ्यांनी निरखून घेऊन खाली पाहावे थोडे
अनंत मरणे झेलून जगती पायी फाटके जोडे
इथल्या फाटक्या जोड्यांसाठी तुमचे दान असावे
या चेंडूवर, या फटक्यावर शतदा प्रेम करावे
कवि – गोरख शेंद्रे
ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कवि संमेलनाला काव्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. व्यवस्थेवर प्रहार करणाऱ्या रचनांना श्रोत्यांची वाहवा व मोठी पसंती मिळाली. सहभागी सर्वच कविंनी आपल्या ताकदीच्या काव्यरचनांमधून उपस्थित रसिक-श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. सद्यस्थितीवर परखड भाष्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई आयोजित कवी संमेलन अंबाजोगाईकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. हे विशेष होय. कवि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाईचे अध्यक्ष ऍड.अनंतराव जगतकर, सचिव शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त कार्यकारिणीने पुढाकार घेतला.


Categories

Recent Posts