Breaking
Updated: नोव्हेंबर 4, 2025
चेअरमन रमेश आडसकर यांची ग्वाही
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelचेअरमन रमेश आडसकर यांची ग्वाही
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांपेक्षा सर्वाधिक भाव अंबा साखर देणार अशी ग्वाही अंबासाखरचे चेअरमन रमेश आडसकर यांनी दिली.
अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२५ वर्षाच्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज चेअरमन रमेश आडसकर, व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील, संचालक राजाभाऊ औताडे, हभप भगवान महाराज वरपगावकर यांच्या मोळी टाकून हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन रमेश आडसकर बोलत होते.
आपल्या विस्तारीत भाषणात चेअरमन रमेश आडसकर यांनी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर म्हणाले की, अंबा साखर उभारणीच्या काळात या भागात कारखाना मंजुरीसाठी ३ प्रस्ताव होते. परंतु, तीन जिल्ह्यांचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून १९६९ साली अंबा साखरची सुरूवात झाली. कारखान्यास यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. मागील ५० वर्षांमध्ये या कारखान्याने अनेक चढउतार पहिले आहेत. तसेच आपण अनेक अडचणींना सामोरे ही गेलेलो आहोत.
या कारखान्याचे दिवंगत संस्थापक मा.ज्ञानोबारावजी पाटील साहेब व संस्थापक माजी आमदार बाबुरावजी आडसकर साहेब, भगवानराव बापू लोमटे, आनंदराव बापू चव्हाण, ऍड.चेवले साहेब यांच्यासह सहकाऱ्यांनी लावलेल्या या सहकाराच्या रोपट्यामुळे या भागात सहकार चळवळीला बळकटी मिळाली. तसेच या परिसराच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी मोठी मदत ही झाली. साखर कारखानदारी दर तीन ते चार वर्षांत दुष्काळाला सामोरे जाते. त्यामुळे गाळपात सातत्य राहत नाही व हा उद्योग हंगामी चालत असल्यामुळे वेळोवेळी कारखानदारी समोर आर्थिक अडचणी ही उभ्या राहतात.
अशा परिस्थिती मध्ये अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे यासाठी माझे सन २००९ पासूनच प्रामाणिक प्रयत्न राहिलेले आहेत. यावर्षी राज्य व केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय सहकार विकास निगम, नवी दिल्ली यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी मार्जिन मनी लोन ८० कोटी रूपये मंजूर करून घेतले. यातून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सांगली, पतसंस्था, शुगरकेन डेव्हलपमेंट फंड, नवी दिल्ली या संस्थांची एक रकमी परत फेडीनुसार थकित देणे देण्यात आली. तसेच थकीत तोडणी वाहतूक करार, थकीत प्रॉव्हिडंट फंड व महावितरणच्या थकलेल्या रकमेसह या सर्व रकमा कारखान्याने अदा केल्यामुळेच व उर्वरित रकमेचा उपयोग ही या कारखान्याची जुनी झालेली यंत्रणा व बॉयलर, मिल, टर्बाईन, मशिनरीची देखभाल दुरूस्ती व काही प्रमाणात मशिनरीचे आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे.
आवश्यक बांधकाम, त्यामुळे ८० कोटी रूपये कर्जाचा विनियोग अत्यंत काटकसरीने व योग्य पद्धतीने करण्यात आलेला आहे. पैसे कमी पडत असल्याने व्हाइस चेअरमन दत्तात्रय आबा पाटील, संचालक राजाभाऊ औताडे व मी आम्ही मिळून वैयक्तिक पैसे एकत्र जमवून राहिलेली कामे करीत आहोत. ऊस तोडणी वाहतूक रक्कम ही अदा केली आहे. आता कारखान्यांची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपाचे उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आलेले असून, कारखाना अत्यंत कार्यक्षमतेने चालविणार आहोत. हा कारखाना अधिक सक्षम पध्दतीने चालण्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्न करीत असून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस या कारखान्यात गाळपासाठी देवून सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना कारखान्याचे व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील यांनी कारखान्याकडे असणारी ३० के.एल.पी.डी.असवानी प्रकल्पातील आपण रेक्टिफाइड स्पिरीटचे उत्पादन घेत होतो, मात्र यापुढे आपण इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय आमच्या संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे काही प्रमाणात कारखान्याला आर्थिक फायदा होणार आहे. कारखान्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी संचालक मंडळाने को प्राडेक्टिव्ह उपक्रम सुरु करण्यावर अधिक भर दिला असून इथेनॉल प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या दुरुस्त्या करण्यात आल्या असून यावर्षी या प्रकल्पामुळे कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न होईल.
या सोबतच सीएनजी गॅस निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा संचालक मंडळ विचार करीत आहे. हा प्रकल्प निर्मितीसाठीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असून केंद्र शासनाच्या गॅस निर्मितीच्या धोरणानुसार या प्रकल्पास मोठ्या सबसीडीसह लवकरच मान्यता मिळेल. यावर्षीचा गळीत हंगाम सुरु करण्यापूर्वी हा प्रकल्प सुरू करण्यात येवून पुढे ऊस वाहतुकीसाठी गॅसवर चालणा-या ट्रक मधुनच ऊस गाळपासाठी आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळ करीत असल्याचे व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील यांनी सांगितले.
कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचे उत्पादन वाढीसाठी यापुढे प्रयत्न करणार आहोत. एआय – कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस उत्पादन वाढीसाठी त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे यापुढे हा कारखाना सक्षमपणे चालविणार आहोत असे सांगून व्हाइस चेअरमन दत्ता आबा पाटील यांनी आपल्या सर्वांचे सहकार्य व मदतीने अंबा कारखान्याला गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करुन सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास गाळपाकरीता पुरवावा यावा अशी विनंती व आवाहन केले.
या कार्यक्रमात हभप भगवान महाराज वरपगावकर यांनी मंत्र पठण करुन या गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी इश्वराकडे आवाहन केले तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपला ऊस गाळपासाठी देण्याची विनंती केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक राजाभाऊ औताडे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक डी. एन. मरकड यांनी केले. कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमासाठी केज-अंबाजोगाई तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजूर, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.