Breaking

दामिनी पथकाची कॉफी शॉपवर धडक कारवाई; ११ जणांवर प्रतिबंधात्मक गुन्हे

Updated: ऑक्टोबर 25, 2025

By Vivek Sindhu

दामिनी पथकाची कॉफी शॉपवर धडक कारवाई; ११ जणांवर प्रतिबंधात्मक गुन्हे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दामिनी पथकाने शहरातील कॉफी शॉप्सवर तपास मोहीम राबवून गैरप्रकारांना आळा घालण्याची कारवाई सुरू केली आहे. आज दुपारी बीड शहरासह गेवराई परिसरात पेट्रोलिंग दरम्यान विविध कॉफी शॉप्सची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान गैरवर्तन करत असलेल्या ११ तरुणांवर गेवराई पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कलम ११० व ११७ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

पोलीस खात्याच्या आकडेवारीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत जिल्ह्यातील विविध कॉफी शॉप्सवर अशा स्वरूपाच्या एकूण ८४ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच शाळा, कॉलेज, क्लासेस आणि हॉस्टेलच्या बाहेर उभे राहून मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमियोंवरही या कलमान्वये प्रतिबंधात्मक गुन्हे दाखल करण्यात आले असून, अशा एकूण १६८ कारवाया आजपर्यंत झाल्या आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पीएसआय पल्लवी जाधव, सहायक फौजदार मीरा रेडेकर, पोलीस हवालदार शोभा जाधव, पोलीस हवालदार अशोक शिंदे आणि पोलीस शिपाई उर्मिला म्हस्के (दामिनी पथक, बीड) यांनी सहभाग घेतला.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या किंवा महिलांना त्रास देणाऱ्या घटकांविरोधात तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, जेणेकरून अशा वर्तनावर कडक कारवाई करता येईल.


Categories

Recent Posts