Breaking

अंबाजोगाई शहर पोलिसांकडून नागरिकांना दिवाळीत सुरक्षिततेचे आवाहन

Updated: ऑक्टोबर 17, 2025

By Vivek Sindhu

‘आपली सुरक्षितता हीच आमची खरी दिवाळी’

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘आपली सुरक्षितता हीच आमची खरी दिवाळी’

अंबाजोगाई : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनतर्फे जनजागृती करण्यात आली आहे. “आपली सुरक्षितता हीच आमची खरी दिवाळी” या घोषवाक्याखाली पोलिसांनी नागरिकांना खबरदारीचे विविध उपाय सांगत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पोलीस प्रशासनाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांदरम्यान घर बंद ठेवताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, दागदागिने उघडपणे न परिधान करता सणांचा आनंद साजरा करावा, तसेच बाहेरगावी जाताना घराभोवती शेजाऱ्यांना माहिती देऊन सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी. मौल्यवान वस्तू लॉकर्समध्ये ठेवणे, संशयास्पद व्यक्ती अथवा विक्रेत्यांपासून सावध राहणे, आणि संशयास्पद हालचाली त्वरित पोलिसांना कळविणे या बाबींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच नागरिकांनी रस्त्यावर चलनवलन करताना मोबाइल, पर्स आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, तर एटीएममधून पैसे काढताना आजूबाजूच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असे पोलिसांनी सांगितले आहे. महिलांनी मौल्यवान दागिने घालून एकट्याने प्रवास टाळावा, अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये, तसेच बँका, दुकाने आणि बाजारपेठांमध्ये सावधगिरी बाळगावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांना सूचित केले आहे की, संशयास्पद व्यक्ती दिसल्यास किंवा कोणतीही गुन्हेगारी हालचाल आढळल्यास तात्काळ अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन क्रमांक ९२२५० ९२८२३ किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा.

दिवाळी सण आनंदात आणि सुरक्षिततेत पार पडावा, यासाठी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक शरद जोगदंड यांनी शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Categories

Recent Posts